06 February, 2025

शासनाच्या लोककल्याणकारी योजनांची चित्ररथातून गावोगावी प्रचार-प्रसिद्धी

हिंगोली (जिमाका), दि. 06 : जिल्हा वार्षिक अनुसूचित जाती उपयोजना सन 2024-2025 अंतर्गंत सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांची गरजूंना माहिती व जनजागृती होण्यासाठी जिल्हाभरात चित्ररथ फिरत असून, नागरिकांनी योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. राज्याचे अन्न व औषध प्रशासन, विशेष सहाय्य मंत्री तथा हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनी संत नामदेव पोलीस कवायत मैदानावर हिरवी झेंडी दाखवून प्रचार-प्रसिद्धी मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला आहे. हे चित्ररथ जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागात जाऊन प्रचार-प्रसिध्दी करत आहेत. जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा समाज कल्याण अधिकारी यादव गायकवाड, जिल्हा नियोजन अधिकारी. गं. गो. चितळे यांच्या सहयोगाने हा चित्ररथ फिरत आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील औंढा नागनाथ, सेनगाव शहर आणि शिरड शहापूर, उमरा, टाकतोडा, आजेगाव, कवठा, वरुड चक्रपाणी, सापटगाव, सुळदाली (खुर्द) वाढोना, गोळेगाव, सेंदुरसना, सिराळा, रुपुर, म्हाळशी आणि वडद या गावांमध्ये विविध योजनांची जनजागृती करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना तसेच लाभार्थ्यांना या चित्ररथाच्या माध्यमातून विविध योजनांची माहिती मिळण्यास मदत होत आहे. सामाजिक न्याय विभागाच्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांकरिता शासकीय वसतिगृह व निवासी शाळा चालविणे, अनुसूचित जातीच्या मुलामुलींना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहायता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांचा पुरवठा करण्याची योजना, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, रमाई आवास योजना (घरकुल), सैनिक शाळेतील अनुसूचित जाती, विजाभज, विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता यासह विविध शासनाच्या कल्याणकारी योजनाची लाभार्थ्यांना माहिती व जनजागृती होण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने आयोजित हे चित्ररथ जिल्ह्यात प्रसिद्धी करत आहेत. त्यामुळे या चित्ररथाच्या माध्यमातून पात्र व गरजू नागरिक तसेच लाभार्थ्यांना विविध योजनांची माहिती मिळण्यास मदत होणार आहे. चित्ररथाद्वारे जनजागृती करण्यासोबतच जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजना, बालविवाह प्रतिबंधक कायदा: सन 2006, मागेल त्याला सौर कृषि पंप, आयुष्यमान भारत, महात्मा ज्योतीराव फुले जनआरोग्य योजना आणि अनुसूचित जाती उपयोजनाअंतर्गत मागासवर्गीय मुलां-मुलीसाठी शासकीय वसतिगृह, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना, अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहायता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांचा पुरवठा करण्याची योजना, रमाई आवास योजना (घरकुल) या कल्याणकारी योजनांवर आधारित भित्तीपत्रिकाही वितरीत करून त्याद्वारेही प्रसिद्धी करण्यात येत आहे. ******

No comments: