05 February, 2025
कर्करोगाचे वेळेत निदान व योग्य उपचारातून सकारात्मक जीवन जगा - जिल्हाधिकारी अभिनव गोयल
हिंगोली, दि. 05 (जिमाका) : कर्करुग्णांनी वेळेत तपासणी, निदान करून वेळेत उपचार घेत सकारात्मक जीवन जगावे. तसेच डॉक्टर, आशा वर्कर यांनी रुग्णांची वेळेत तपासणी, निदान आणि उपचार करत एक सकारात्मक संदेश द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी केले.
हिंगोली येथे जागतिक कर्करोग दिनानिमित्त जिल्हास्तरीय कर्करोग तपासणी आणि जनजागृती मोहिमेचे उद्घाटन जिल्हाधिकारी श्री. गोयल यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. गोपाल कदम, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. शैलजा कुप्पास्वामी, डॉ. नंदकिशोर कर्वा, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पांडुरंग फोपसे, डॉ. फैसल खान, डॉ बालाजी भाकरे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी श्री ज्ञानेश्वर चौधरी उपस्थित होते.
आरोग्य विभागामार्फत कर्करोग तपासणी आणि जनजागृती मोहीम जिल्हाभरात राबविण्यात येत आहे. या मोहिमेदरम्यान कर्करोगाविषयी व्यापक जनजागृती, तपासणी, निदान आणि उपचार केले जाणार आहेत.
कर्करोगाशी निगडित चांगल्या प्रकारचे संदेश आशा स्वयंसेविकांनी आपल्या कामातून समाजामध्ये देत, त्यांचे योग्य प्रकारे उपचार करावेत असे सांगून त्यांचा जीवनाकडे सकारात्मक बघण्याचा दृष्टिकोण निर्माण करावा, असेही जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी सांगितले.
याप्रसंगी कॅन्सर वॉरियर डॉ. फैसल सलिम खान (नोडल वैद्यकीय अधिकारी, दंत रोग तज्ञ) यांचा त्यांनी केलेल्या कर्करोग नियंत्रणविषयक कार्यासाठी मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
त्याचप्रमाणे कर्करोगाची व्यापक प्रमाणावर जनजागृती व्हावी या उद्देशाने जिल्हा सामान्य रुग्णालय येथून कर्करोग जनजागृती रॅलीला निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. शैलजा कुप्पास्वामी यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखविण्यात आली. तसेच जिल्हा प्रशिक्षण संघ हिंगोली येथे रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. एस शैलजा कुप्पास्वामी यांनी केले. कर्करोग तपासणी व जनजागृती मोहिमेची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके यांनी दिली.
यावेळी जिल्हा लेखा व्यवस्थापक श्रीपाद गारुडी, मेट्रन श्री. चिंचकर, साहाय्यक मेट्रन श्रीमती आशा क्षीरसागर, ज्योती बांगर, आनंद साळवे, मारुती येंगडे, प्रशांत गिरी यांच्यासह आशा वर्कर व नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी आनंद साळवे यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन जिल्हा कार्यक्रम अधिकारी ज्ञानेश्वर चौधरी यांनी केले तर मान्यवराचे आभार अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. गोपाल कदम यांनी मानले.
********
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment