13 February, 2025
बोराळा साठवण तलावाची बांधकाम प्रक्रिया सुरळीत
• कार्यकारी अभियंता आ. अ. कांबळे यांच्याकडून शेतकऱ्यांच्या शंकाचे समाधान
हिंगोली, (जिमाका), दि.13: हिंगोली तालुक्यातील बोराळा साठवण तलाव क्र.2 मौजे बोराळा येथे 16 जानेवारी 2024 पासून साठवण तलावाचे काम सुरु असून, सद्य:स्थितीत धरणाचे 80 टक्के काम पूर्ण झाले आहे. सध्या कंदरभरणीचे 20 टक्के काम बाकी आहे. त्यामुळे बोराळा येथील शेतकरी आणि गावकऱ्यांनी बांधकामाच्या दर्जाबाबात आक्षेप घेत जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्याकडे निवेदन केले होते. मात्र आज सकाळी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे लघुपाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता आ. अ. कांबळे यांनी जिल्हाधिकारी श्री. गोयल यांच्या आदेशान्वये तलावाच्या बांधकाम ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन शेतकरी व गावकऱ्यांच्या तक्रारी आणि आक्षेपाचे निरसन केले असून, आता या तलावाचे बांधकाम प्रक्रिया सुरळीत सुरु असल्याचे कार्यकारी अभियंता श्री. कांबळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
शनिवार (दि.8) रोजी बोराळा गावातील काही शेतकरी व गावकरी यांनी कामावर जाऊन काम निकृष्ट असल्याचे सांगून काम बंद केले होते. त्यानंतर त्यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्याकडे तलावाचे काम निकृष्ट दर्जाचे होत असून कामात तडे गेले आहेत, अशी तक्रार दिली होती. त्यानंतर आज गुरुवारी कार्यकारी अभियंता आणि गावकऱ्यांनी चर्चेअंती तलावाशी संबंधीत अभियंते व बारोळा गावातील शेतकरी, पदाधिकारी व गावकऱ्यांना प्रत्यक्ष तलाव बांधकाम होत असलेल्या ठिकाणी कामाची संयुक्त पाहणी केली.
त्यामुळे गावकऱ्यांनी उपस्थित केलेल्या संधानक कामाच्या गुणवत्तेबाबतच्या शंकांचे निरसन केले. संधानककामाचे मूळ काम व जलशिपन करण्यासाठी अनुषंगीक कामे याची खातरजमा करून तसेच संधानक कामात पडलेल्या लहान तड्यां(हेअर क्रॅक) बाबतही कार्यकारी अभियंता कांबळे यांनी शेतकऱ्यांचे शंका निरसन केले. त्यानंतर शेतकऱ्यांनी वाढीव काम व रस्त्याबाबत मागणी केली. त्यावर कार्यकारी अभियंता यांनी सक्षम स्तरावरुन मान्यतेकरीता प्रस्ताव पाठविला जाईल,असे सांगितले. त्यामुळे गावकऱ्यांनी बांधकामाबाबत इतर कोणतीही तक्रार नसल्याचे सांगितले.
त्यामुळे बोराळा तलाव बांधकामाबाबत वेळीच शंका निरसन झाल्यामुळे बांधकाम सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली असल्याचे कार्यकारी अभियंता आ. अ. कांबळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment