19 February, 2025
आदिवासी लाभार्थ्यांनी विविध योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन
हिंगोली (जिमाका), दि. 19 : सन 2024-25 मधील केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनेंतर्गत मंजूर आराखड्यानुसार परभणी व हिंगोली जिल्ह्यातील त्या-त्या भागातील सर्व इच्छूक आदिवासी लाभार्थ्यांसाठी विविध योजनांच्या लाभासाठी अर्ज वितरण व स्वीकारण्याचे अंतर कमी व्हावे यासाठी प्रकल्प कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कळमनुरी जि. हिंगोली व पंचायत समिती जिंतूर जि. परभणी येथे दि. 20 फेब्रुवारी ते 13 मार्च, 2025 पर्यंत सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत शासकीय सुटीचे दिवस वगळून अर्ज वितरण व स्वीकारण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
आदिवासी समाजातील लाभ घेण्यासाठी इच्छूक लाभार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
आदिवासी लाभार्थ्यांना 85 टक्के अनुदानावर नळ फिटींग, इलेक्ट्रीकल, ॲटोमोबाईल, सुतार काम व इतर विविध व्यवसायासाठी अर्थसहाय्य करण्यासाठी रहिवाशी प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, तहसीलचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र, अपंग, विधवा, परितक्त्या, दारिद्रयरेषेखालील असल्यास प्रमाणपत्र, शिधापत्रिका, शासकीय सेवेत नसल्याचे प्रमाणपत्र आणि आधार कार्ड आदी कागदपत्रे जोडून अर्ज करणे आवश्यक आहे.
आदिवासी बचतगटाना 85 टक्के अनुदानावर पत्रावळी व द्रोन तयार करण्याचे मशीन घेण्यासाठी अर्थसहाय्य करण्यात येणार आहे. यासाठी रहिवाशी प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, तहसीलचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र, आधार कार्ड, शिधापत्रिका, सर्व सदस्यांचे शासकीय सेवेत नसल्याचे प्रमाणपत्र, बचत गटातील सदस्यांची यादी, बचत गटाचा ठराव आणि बचत गटाचे नोंदणी प्रमाणपत्र जोडून अर्ज करणे आवश्यक आहे.
विहित मुदतीनंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. वरील योजनांमध्ये अंशत:, पूर्णत: बदल करण्याचे तसेच वरीलपैकी कोणतीही योजना राबविण्याचा अथवा न राबविण्याचा अधिकार प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कळमनुरी जि. हिंगोली यांनी राखून ठेवलेला आहे. प्रकल्पांतर्गत असलेल्या लाभार्थ्यांनी वरील योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रकल्प कार्यालयात अर्ज सादर करावे, असे आवाहन सुनिल बारसे, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कळमनुरी जि. हिंगोली यांनी केले आहे.
******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment