28 February, 2025

महाशिवरात्रीनिमित्त औंढा नागनाथ येथे चाईल्ड हेल्पलाईनकडून जनजागृती

हिंगोली (जिमाका), दि. 28 : महाशिवरात्रीनिमित्त औंढा नागनाथ येथील मंदिर परिसरात चाईल्ड हेल्पलाईन 1098 कक्षाकडून जनजागृती करण्यात आली. यावेळी आपल्या आजूबाजूला जर बालकामगार, बालभिक्षेकरी, बाललैंगिक अत्याचार, हरवलेली बालके, सोडून दिलेली बालके, बालविवाह संकटग्रस्त बालके आढळल्यास अशा बालकांना मदत करण्यासाठी 1098 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा बाल संरक्षण अधिकारी तथा चाईल्ड हेल्प लाईनच्या सनियंत्रण अधिकारी सरस्वती कोरडे यांनी केले. संकटग्रस्त बालकांना त्वरीत मदतीसाठी भारत सरकार महिला व बाल विकास नवी दिल्ली व महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग यांच्यामार्फत 0 ते 18 वयोगटातील कोणत्याही प्रकरच्या अडचणीत व संकटात सापडलेल्या तसेच काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या सर्व बालकांसाठी चाईल्ड हेल्प लाईन 1098 ही सेवा जिल्ह्यात कार्यरत आहे. चाईल्ड हेल्पलाईन 1098 संकटग्रस्त बालकांना 24x7 हेल्प लाईन सेवा उपलब्ध आहे. 1098 वर संपर्क साधणाऱ्या व्यक्तीचे नाव गोपनीय असते. त्यामुळे एखाद्या संकटग्रस्त बालकास मदत करण्यासाठो संपर्क करावा, अशी माहिती जिल्हा प्रकल्प समन्वयक संदीप कोल्हे यांनी दिली. चाईल्ड हेल्पलाईनचे समुपदेशक अंकुर पाटोडे, पर्यवेक्षक विकास लोणकर, श्रीकांत वाघमारे, केस वर्कर राजरत्न पाईकराव, केस वर्कर सुरज इंगळे यांनी जिल्ह्यात काळजी व संरक्षणाची गरज संकटग्रस्त बालकांची तात्काळ मदत करण्यासाठी चाईल्ड हेल्पलाईन 1098 च्या माध्यमातून जिल्ह्यातील विविध समस्या असणाऱ्या बालकांचे पुनर्वसन करण्याचे काम चाईल्ड हेल्पलाईन 1098 च्या माध्यमातून केले जाते. त्यामध्ये बालकाप्रती काम करणाऱ्या यंत्रणा, विविध सण उत्सव, समारंभ विविध धार्मिक स्थळ यांच्यासोबत समन्वय साधून रात्रंदिवस 24x7 जनजागृती व आउटरीचच्या माध्यमातून बालकांचे पुनर्वसन करण्यात येत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. ********

No comments: