15 March, 2023

 जिल्हा कृषि महोत्सवाचे 25 ते 28 मार्च या कालावधीत आयोजन

जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवून लाभ घेण्याचे आवाहन

 

 

हिंगोली (जिमाका), दि. 15 : पैनगंगा, कयाधू व पूर्णा नद्यांच्या खोऱ्यात वसलेला हिंगोली जिल्हा हा हळद या पिकासाठी महाराष्ट्र राज्यात सर्वांत अग्रगण्य आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांची शाश्वत प्रगती व्हावी, हळदीसह इतर कडधान्य, गळीतधान्य व तृणधान्य पिकांनाही शाश्वत बाजार भाव मिळावा. शेतमाल उद्योग प्रक्रियेला चालना मिळावी. शेतकरी,  राज्य पातळीवरील व विद्यापीठातील नामांकित वरिष्ठ कृषि शास्त्रज्ञ यांच्यामध्ये थेट संवाद व्हावा म्हणून कृषि विभागाच्या संकल्पनेतून हिंगोली येथील रामलीला मैदानावर भव्य जिल्हा कृषि महोत्सव दि. 25 ते 28 मार्च, 2023 या कालावधीत नियोजित आहे.

            या महोत्सवामध्ये दोनशे पेक्षा जास्त स्टॉल, परिसंवाद व चर्चासत्र, कृषि निविष्ठा, सिंचन साधने, गृहपयोगी विक्री दालन, मशीनरी व अवजारे, कृषि विज्ञान केंद्र, हळदीवर प्रक्रिया करणाऱ्या उद्योग समुहांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे.

            या चार दिवशीय प्रदर्शनात शेतकऱ्यांना तृणधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिक क्षेत्र व विविध विषयावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच काढणी पश्चात तंत्रज्ञान, उद्योगातील संधी व आव्हाने, हळद मूल्यवर्धन साखळी, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील उत्पादन बाजारभाव व भौगोलिक मानांकन, जगातील आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य (मिलेट) वर्ष याबाबत विविध विषयावर मार्गदर्शन, शेतमालाचे खरेदी विक्रीबाबत मार्गदर्शन, शेतमालाचे मूल्यवर्धन, उत्पादक ते खरेदीदार संमेलन, जिल्ह्यात नवीन पिके जसे ड्रॅगन फु्रट, करवंद, करडई लागवड या पिकाविषयी सविस्तर मार्गदर्शन तसेच विविध पिकाचे आधुनिक तंत्रज्ञान इत्यादी विषयी तज्ज्ञाचे मार्गदर्शन शेतकऱ्यांना लाभणार आहे. यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवून लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासन व कृषि विभागामार्फत करण्यात आले आहे.

*****

No comments: