चला जाणुया नदी
अभियानांतर्गत आसना नदीच्या संवाद यात्रेचा असेगाव येथे समारोप
नदीला जीवन वाहिनी, अमृत वाहिनी बनविण्यासाठी चळवळ निर्माण करणे
गरजेचे
- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर
हिंगोली
(जिमाका), दि. 14 : नदीला जीवन वाहिनी, अमृत वाहिनी बनविण्यासाठी युवक, गावकरी, महिला,
पुरुष व कर्मचारी यांनी चळवळ निर्माण करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी
जितेंद्र पापळकर यांनी केले.
आसना नदीच्या नदी संवाद यात्रेचा
समारोप वसमत तालुक्यातील आसेगाव येथे करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या
अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर हे होते. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी विभागीय वन अधिकारी बाळासाहेब कोळगे, उपविभागीय अधिकारी डॉ.सचिन खल्लाळ,
चला जाणूया नदी राज्य समितीचे सदस्य तथा उगम संस्थेचे अध्यक्ष जयाजी पाईकराव, सरपंच पदमिनीबाई मुळे, नायब तहसीलदार पळसकर, गट शिक्षण अधिकारी
सोनटक्के, सहाय्यक गट विकास अधिकारी अंभोरे, शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी
तानाजी भोसले, वन परिक्षेत्र अधिकारी शुभांगी चाटे, शिक्षण संस्था चालक रामचंद्र
बागल आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना जिल्हाधिकारी श्री. पापळकर
म्हणाले, पडणारा पाऊस आणि त्याचा योग्य वापर होणे गरजेचे
आहे. नदी तीव्र उताराची आहे. त्यामुळे त्यामध्ये वाहून जाणारे पाणी साठवून राहत
नाही. तसेच नदी काठावरील गाळ वाहून जाऊन नदीचे पात्र उथळ झाले आहे. त्यामुळे जल
संधारण होण्यासाठी मन संधारण होणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.
आपल्या जिल्ह्यात आसना व कयाधू नदीचे
पुनरजीवन करण्यासाठी चला जाणूया नदीला नदी संवाद यात्रा सुरु केली आहे. या
माध्यमातून आपली नदी कशी जिवंत राहील. चला जाणूया या अभियानाच्या माध्यमातून
गावागावामध्ये हा विचार रुजवायला सुरुवात झाली आहे. लोकसहभाग व प्रशासनाच्या
सहकार्याने नदीला पुनरिजिवित करण्यासाठी आराखडा तयार करण्याची गरज आहे. यासाठी
जनमाणसामध्ये नदीचे महत्व पटवून दिले पाहिजेत. गावाच्या हातामध्ये हा कार्यक्रम
सोपविणे गरजेचे आहे. संभाव्य पुराचा धोका टाळण्यासाठी नदीला पुनरजिवित करणे आवश्यक
आहे. भविष्याचा विचार करुन नदी पुनरजिवित करण्यासाठी आराखडा तयार करावा आणि आसना
नदीच्या पुनरजीवनासाठी सहभाग नोंदवावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर
यांनी यावेळी केले.
याप्रसंगी
उपविभागीय अधिकारी डॉ.सचिन खल्लाळ यांनी नदी वाचवण्यासाठी जनमाणसामध्ये जनजागृती
निर्माण करण्याची गरज आहे. संवाद यात्रेच्या माध्यमातून डोळसपणे बघण्याची जाणीव
निर्माण झाली आहे. या माध्यमातून नदीविषयी आपली जबाबदारी काय आहे याची जनजागृती
करणे, वातावरण निर्मिती तयार करण्याचे काम या माध्यमातून होत आहे. यासाठी नदी
वाचवण्यासाठी जनमाणस तयार गरज असल्याचे सांगितले.
शाळेमधील विद्यार्थ्यांनी गावातील
प्लास्टिक जमा केले व प्लास्टिकने भरलेल्या शेकडो बॉटल विद्यार्थ्यांनी शाळेत जमा
केल्या. नदी मध्ये जाणारे प्लास्टिक थांबविण्यात शिक्षण विभागानी पुढाकार घेतला
आहे. निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या डोक्यात
नदी जिवंत करायला हवी म्हणून त्यांनी वाटचाल सुरु केली आहे, असे शिक्षण विस्तार
अधिकारी तानाजी भोसले यांनी सांगितले.
आसना नदी एकेकाळी बारमाही वाहत होती. ती हंगामी झाली आहे. कारण
पाणी उपसा वाढला आहे. पुनर्भरण प्रक्रिया राबविणे गरजेचे आहे. नदी पूर्ववत
होण्यासाठी सर्वांनी सक्रीय सहभाग घेणे गरजेचे असल्याचे उगम ग्रामीण विकास
संस्थेचे अध्यक्ष जयाजी पाईकराव यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात वन परिक्षेत्र अधिकारी शुभांगी चाटे
यांनी जनसंवाद यात्रेचा उद्देश, रुपरेषा व आढावा मांडला. पाणी आणि सामाजिक विषयावर
हास्य कलाकार रमेश गिरी व संच यांनी प्रबोधन केले. कार्यक्रमाचे सुत्र संचालन
विकास कांबळे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी दिशांत पाईकराव,
चातूर्मुखी विनायक, शाळेचे शिक्षक श्याम संगेवर, रजनी चित्तेवार, प्रतिभा पवार
उपस्थित होते.
****
No comments:
Post a Comment