पात्र एपीएल शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना
अन्नधान्याऐवजी आता बँक खात्यात थेट रोख रक्कम
• आवश्यक कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन
हिंगोली (जिमाका), दि. 09 : राज्यातील 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्न
सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत समाविष्ट न झालेल्या एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारक
शेतकऱ्यांना प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांप्रमाणे दरमहिन्याला कुटुंबातील
प्रतिसदस्य पाच किलो अन्नधान्य देण्यात येत होते. यामध्ये गहू प्रतिकिलो दोन रुपये
आणि तांदूळ प्रतिकिलो तीन रुपये दराने मिळत होता. या योजनेंतर्गत यापुढे गहू व
तांदूळ उपलब्ध होणार नसल्याचे भारतीय अन्न महामंडळाने कळविले आहे. त्यामुळे या
लाभार्थ्यांना जानेवारी 2023 पासून अन्नधान्याऐवजी प्रतिमाह प्रतिलाभार्थी 150
रुपये इतकी रोख रक्कम डीबीटीद्वारे हस्तांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या योजनेच्या लाभासाठी जिल्ह्यातील रेशन कार्ड मॅनेजमेंट सिस्टीमवर
(आरसीएमएस) नोंद असलेल्या पात्र एपीएल शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांनी ‘डीबीटी’साठी
बँक खात्याचा विहीत नमुन्यातील फॉर्म संबंधित रास्तभाव दुकानदार किंवा तलाठी
यांच्याकडून प्राप्त करून घ्यावा. हा फॉर्म भरुन अर्जासोबत शिधापत्रिकेच्या
पहिल्या व शेवटच्या पानाची छायांकित प्रत, बँक पासबुकच्या पहिल्या (खात्याचा
आवश्यक तपशील दर्शविणाऱ्या) पानाची प्रत, शिधापत्रिकेतील सदस्यांच्या आधारकार्डची
छायांकित प्रत इत्यादी कागदपत्रे रास्तभाव दुकानदार किंवा सबंधित तलाठी यांच्याकडे
तात्काळ जमा करावीत, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.
महिला कुटुंब प्रमुखाच्या
बँक खात्यात जमा होणार रक्कम
या योजनेअंतर्गत वितरीत करावयाची रोख रक्कम महिला प्रमुखाच्या आधार
संलग्न बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. जर काही पात्र शिधापत्रिकाधारक महिला
कुटुंब प्रमुखाचे कोणत्याही बँकेत खाते नसल्यास अशा महिलांनी राष्ट्रीयकृत बँकेत
खाते काढून घ्यावे व त्याची छायांकित प्रत अर्जासोबत जमा करावी, असेही जिल्हा पुरवठा
अधिकारी, हिंगोली यांनी कळविले आहे.
*****
No comments:
Post a Comment