26 March, 2023

 

शेततळे अस्तरीकरणामुळे गंगाधर गायकवाड

यांना मिळाला पाण्याचा शाश्वत स्त्रोत

 



            शेती  उत्पादनामध्ये शाश्वतता आणण्यासाठी तसेच दुष्काळावर मात करण्यासाठी शेततळे उपयुक्त असल्याने राज्यातील पर्जन्यावर आधारित कोरडवाहू शेतीसाठी पाणलोट व जलसंवर्धन माध्यमातून जलसिंचनाची उपलब्धता वाढविणे तसेच संरक्षित व शाश्वत सिंचनाची सुविधा निर्माण करण्यासाठी मागेल त्याला शेततळे” योजना राबविण्यात येत आहे.

हिंगोली तालुक्यातील राहोली बु. येथील रहिवासी गंगाधर किशनराव गायकवाड यांची मौजे राहोली बु. येथे गट क्र. 117 मध्ये गावालगत 1.28 हेक्टर जमीन आहे. ‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेतून गंगाधर गायकवाड यांना सन 2017-18 मध्ये 30×25×3 या आकाराचे शेततळे मंजूर झाले होते. त्यांना शेततळ्यासाठी 49 हजार रुपये अनुदान मिळाले होते. या अनुदानातून श्री. गायकवाड यांनी मागेल त्याला शेततळे योजनेतून त्यांच्या शेतात शेततळे घेतले होते.

त्यामध्ये त्यांनी त्यांच्याकडे असलेल्या बोअरवेलद्वारे शेततळ्यामध्ये पाणी सोडत होते. परंतु बोअरवेलला रब्बी हंगामामध्ये कमी पाणी असल्याने पिकांना पाण्याची कमतरता पडत होती. त्यामुळे उत्पन्नात दरवर्षी घट येत असल्याने त्यांचे नुकसान होत होते.

गंगाधर गायकवाड यांना हिंगोलीचे तालुका कृषि अधिकारी बालाजी गाडगे यांच्याकडून नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प अंतर्गत त्यांच्याकडे असलेल्या शेततळ्यामध्ये अस्तरीकरण केल्यास पाणीसाठा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होण्यास मदत होईल असे मार्गदर्शन मिळताच गंगाधर गायकवाड यांनी नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पामध्ये शेततळे अस्तरीकरण या बाबीसाठी 2020-21 मध्ये अर्ज केला. त्यांना शेततळे अस्तरीकरणासाठी 67 हजार 728 रुपये अनुदानही मिळाले होते. या अनुदानातून श्री. गंगाधर गायकवाड यांनी शेततळ्याला पॉलीथीन अस्तरीकरण प्रक्रिया पूर्ण केली.

            शेततळ्यात अस्तरीकरण केल्यामुळे खरीप हंगामात काही पाणी पावसामुळे व उर्वरित पाणी हे त्यांच्याकडे असलेल्या बोअरवेल मधून शेततळ्यात साठवले आहे. या पाण्याचा वापर करुन आजमितीला रब्बीमध्ये हरभरा पीक, खरीप व रब्बीत हळद या पिकाला पाणी देण्यासाठी त्याचा चांगला वापर होत असल्याचे सांगितले. सध्या श्री. गायकवाड यांच्या शेतात हळद पीक जोमदार आणि चांगले उत्पन्न मिळेल या अवस्थेत आहे. त्यापासून एकरी अंदाजे 25 ते 30 क्विंटल हळदीचे उत्पन्न होणे अपेक्षित आहे. तसेच त्यांनी यावर्षी संत्रा या फळबाग पिकांची लागवड करणार असल्याचे देखील सांगितले.

            नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पातून घेतलेल्या शेततळे अस्तरीकरण या घटकाच्या लाभामुळे गंगाधर गायकवाड यांच्या शेतात पाण्याचा एक शाश्वत स्त्रोत निर्माण होऊन त्यांच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. त्यामुळे त्यांनी कृषि विभागाचे शतश: आभार मानले.

            कृषि विभागाच्या वतीने पाईप, मोटार, तुषार सिंचन, ठिबक सिंचन, शेततळे, अस्तरीकरण इत्यादी घटकाचा योजनेत समावेश केलेला आहे. त्याचा सर्व शेतकरी सभासदांना चांगला फायदा होत आहे. सध्या शेतकऱ्यांना वन्य प्राण्यांमुळे शेतीपिकाचे नुकसान होत आहे. वन्य प्राण्यापासून होणारे नुकसान टाळण्यासाठी इतर बाबीप्रमाणे या प्रकल्पात तारकुंपण या घटकाचा समावेश करावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

            महाराष्ट्र शासनाने यावर्षीच्या अर्थसंकल्पात मागेल त्याला शेततळे योजनेचा व्यापक विस्तार केला आहे. आता मागेल त्याला शेततळे, फळबाग, ठिबक सिंचन, शेततळ्यांचे अस्तरीकरण, मागेल त्याला शेडनेट, हरितगृह, आधुनिक पेरणीयंत्र, कॉटन श्रेडर या योजनेवर एक हजार कोटी खर्च करणार आहे. त्यामुळे याचा राज्यातील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

                                                                                                       --  चंद्रकांत स. कारभारी

                                                                                                             माहिती सहायक

                                                                                                             जिल्हा माहिती कार्यालय, हिंगोली

 

****

No comments: