राज्यभरात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात
साजरी करण्याचे महाज्योतीतर्फे आवाहन
एक कोटी 80 लक्ष रुपयाचे नियोजन
प्रत्येक जिल्ह्यात कार्यक्रम साजरा करण्याचा मानस
हिंगोली (जिमाका),
दि. 16 :
क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा
फुले यांनी सामाजिक प्रबोधन, अस्पृश्यता व जातिव्यवस्थेचे निर्मूलन, आणि स्त्रियांना
व मागास जातीच्या लोकांना शिक्षण देण्याचे कार्य केले. आजच्या आधुनिक विचारांच्या साक्षर
समाज निर्मितीमध्ये त्यांचे अमुल्य योगदान आहे. दिनांक 11 एप्रिल क्रांतीसुर्य महात्मा
ज्योतिबा फुले यांचा जयंतीदिन. यावर्षी महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था
(महाज्योती), नागपूर या संस्थेमार्फत संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहात साजरी करण्याचा
मानस आहे. त्यासाठी इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री अतुल सावे यांच्या अध्यक्षतेखाली
दि. 06 फेब्रुवारी, 2023 रोजी झालेल्या महाज्योती संचालक मंडळाच्या बैठकीत क्रांतीसूर्य
महात्मा ज्योतीबा फुले यांची जयंती सर्व विभाग
व सर्व जिल्ह्यांमध्ये अभिनव पध्दतीने साजरी करण्याबाबत ठराव मान्य करण्यात आलेला आहे.
उपरोक्त
ठरावात प्रत्येक जिल्हयात शिक्षण विभागाच्या समन्वयाने महात्मा ज्योतिबा फुले यांच्या
जीवनातील प्रसंगावर चित्रकला स्पर्धा, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनातील प्रसंगावर
रांगोळी स्पर्धा, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवन व विचारांवर वकृत्व स्पर्धा,
मी सावित्रीबाई बोलते किंवा मी ज्योतिबा बोलतोय या विषयांवर एकांकिका स्पर्धा, महात्मा
ज्योतिबा फुले यांच्या जीवन कार्यावर निबंध स्पर्धा या स्पर्धांचे आयोजन करायचे आहे. वरील नमूद सर्व
कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी तीन लाख रुपये प्रती जिल्हा व दहा लाख रुपये प्रती
विभाग असा निधी महाज्योती मार्फत उपलब्ध करुन देण्यात य़ेणार आहे, अशी माहिती प्रकल्प
व्यवस्थापक, महात्मा ज्योतीबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), महाराष्ट्र
राज्य, नागपूर यांनी दिली आहे.
*****
No comments:
Post a Comment