20 March, 2023

 

हिंगोली जिल्ह्यातील दुय्यम निबंधक कार्यालयात

नागरिकांच्या सोयीसाठी दस्तनोंदणी कामासाठी पर्यायी व्यवस्था

 

 

            हिंगोली (जिमाका), दि. 20 : शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा दि. 14 मार्च, 2023 पासून बेमुदत संप सुरु झालेला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सह जिल्हा निबधंक वर्ग-1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी यांच्या आस्थापनेवरील 5 तालुकास्तरीय कार्यालयापैकी 04 दुय्यम निबंधक कार्यालयातील दस्त नोंदणी व इतर सर्व कामकाज बंद आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. सध्या मार्च महिना सुरु असल्यामुळे नागरिकांचे बँक व्यवहार सुरळीत चालू ठेवण्यासाठी दुय्यम निबंधक कार्यालयाचे कामकाज सुरु ठेवणे आवश्यक आहे.

            बंद असलेल्या 4 दुय्यम निबंधक कार्यालयातील दस्त नोंदणी व अनुषंगिक कामकाज सुरु ठेवण्यासाठी तात्पुरती पर्यायी व्यवस्था म्हणून हिंगोली येथील सह दुय्यम निबंधक वर्ग-2 एस. जी. संकवाड यांच्याकडे खालील नमूद दिनांकासाठी जिल्ह्यातील दुय्यम निबंधक कार्यालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे.

            सह दुय्यम निबंधक वर्ग-2 एस. जी. संकवाड हे दि. 21 मार्च, 2023 रोजी दुय्यम निबंधक श्रेणी-1 वसमत कार्यालयात कामकाज पाहणार आहेत. दि. 23 मार्च रोजी दुय्यम निबंधक श्रेणी-1 औंढा नागनाथ, दि. 24 मार्च रोजी दुय्यम निबंधक श्रेणी-1 कळमनुरी येथे, दि. 27 मार्च रोजी दुय्यम निबंधक श्रेणी-1 सेनगाव कार्यालयात उपस्थित राहून कामकाज पाहण्याचे आर्देश देण्यात आले आहेत.

            सह दुय्यम निबंधक वर्ग-2 एस. जी. संकवाड यांनी वरील नमूद अतिरिक्त कार्यभाराच्या दिवशी त्यांचे मूळ हिंगोली कार्यालयातील दस्त नोंदणी व विवाह नोंदणी या कामकाजाची सांगड घालून अतिरिक्त कार्यभाराच्या ठिकाणी कामकाज करावे. या प्रसंगी नोंदणीचे कामकाज जास्त असल्यास दरस्त नोंदणी विषयक कामकाजाची वेळ वाढविण्याबाबत सह जिल्हा निबंधक कार्यालयास अवगत करावे, असेही आदेश दिले आहेत.

जिल्ह्यातील नागरिकांनी संबंधित दुय्यम निबधंक कार्यालयातील पर्यायी व्यवस्थेचा लाभ घ्यावा, असे आवाहन संजय पाटील, सह जिल्हा निबंधक वर्ग-1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी, हिंगोली यांनी  केले आहे. 

*****

No comments: