27 March, 2023

 

गावात पडणारा पाऊस जमिनीत मुरविण्यासाठी पुढे आले पाहिजे

- उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी




 

हिंगोली (जिमाका), दि. 27  :  सर्वानी पाण्याविषयी संवेदनशील झाले पाहिजे आणि पाणी वाचविण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. तसेच पाणी बचतीच्या सवयी आंगीकारले पाहिजे. बहुतांश शेतकऱ्यांकडे बंद किंवा सुरु बोअर असतील तर त्याचे बोअर पुनर्भरण आणि विहीर पुनर्भरण करुन पाणी पातळी वाढविण्याची गरज आहे. त्यामुळे आपल्या गावात पडणारा पाऊस हा जमिनीत मुरविण्यासाठी पुढे आले पाहिजे. असे प्रतिपादन उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी  केले .  

जिल्हा प्रशासन व उगम ग्रामीण विकास संस्था आणि हिंगोली जिल्ह्यातील समविचारी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने चला जाणुया नदी अभियान हिंगोली तालुक्यातील समगा येथे आयोजित करण्यात आले हाते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी  हे होते. यावेळी गट विकास अधिकारी गणेश बोथीकर, विस्तार अधिकारी भोजे, विस्तार अधिकारी आमले, सरपंच सागरबाई इंगळे उपस्थित होते.  

हरिभाऊ पट्टेबहादूर यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना करताना सांगितले की, एकेकाळी बारमाही असणाऱ्या नद्याचा प्रवाह हा वर्षानुवर्षे कमी होत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या माध्यमातून चला जाणूया नदीला अभियान सुरु करण्यात आले आहे. गावकरी आणि कर्मचारी मिळून प्लॅस्टिक नदी मध्ये फेकणे, नदीचे शोषण थांबविणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. सर्वानी एकजुटीने हे काम हाती घेतले तर नक्कीच नदी बारमाही होईल यात शंकाच नाही, असेही त्यांनी सांगितले. 

विस्तार अधिकारी भोजे यांनी सांगितले की, जलसंधारण करण्यासाठी मनसंधारण करणे आणि त्याची लोकचळवळ होणे गरजेचे आहे. नदीला जिवंत करण्यासाठी शासनाने व गावकऱ्यांनी  समन्वयाने कामे केले तर नक्कीच चांगला परिणाम दिसेल, असे विस्तार अधिकारी भोजे यांनी सांगितले.  

या कार्यक्रमामध्ये बालाजी नरवाडे, दत्तराव घुगे, विलास आठवले, दामोदर घुगे व रामेश्वर मांडगे यांनी मनोगत व्यक्त केले. शाहीर धम्मानंद इंगोले व संच यांनी प्रबोधन केले. तर बाल विवाह विषयी अॅड. अनुराधा पंडित यांनी माहिती दिली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी दिशांत पाईकराव, विठ्ठल चव्हाण, सिद्धार्थ निनूले व ग्रामपंचायत यांनी सहकार्य केले.

*****

No comments: