एपीएल
शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरण करण्यासाठी
बँक
खात्याचा तपशील सादर करण्याचे आवाहन
हिंगोली (जिमाका), दि.
28 : एपीएल (केशरी) शेतकरी योजनेतील पात्र लाभधारकांना माहे जानेवारी,
2023 पासून अन्नधान्याऐवजी प्रतीमहा प्रती लाभार्थी 150 रुपयाप्रमाणे
लाभार्थ्याच्या खात्यामध्ये थेट जमा होणार आहे. या योजनेत आज रोजी 37 हजार 536
शिधापत्रिकाधारक आहेत. थेट हस्तांतरण योजना (DBT-Direct Benefit Transfer) कार्यान्वित करण्यासाठी योजनेतील पात्र
लाभार्थ्यांनी आवश्यक असलेला बँक खात्याचा तपशील दि. 28 फेब्रुवारी, 2023 रोजीच्या
शासन निर्णयासोबत जोडलेल्या नमुन्यात संबंधित रास्त भाव दुकानदारांकडे अथवा तहसील
कार्यालय पुरवठा विभाग यांच्याकडे उचित कागदपत्रे, प्रमाणपत्राची पूर्तता करुन अर्ज
सादर करणे अत्यावश्यक आहे.
या योजनेंतर्गत वितरीत
करावयाची रोख रक्कम महिला कुटुंब प्रमुखाच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्यात
येणार आहे. महिला कुटुंब प्रमुखाचे कोणत्याही बँकेत खाते नसल्यास सदर महिलेस बँक
खाते काढून घेणे गरजेचे आहे.
या योजनेचा लाभ मिळण्यासाठी
शिधापत्रिकेवर नोंद असलेल्या सर्व सदस्यांचे आधार क्रमांक शिधापत्रिका व्यवस्थापन
प्रणालीशी (RCMS) संलग्न असणे आवश्यक राहील. म्हणजेच शिधापत्रिका व्यवस्थापन
प्रणालीवर (RCMS) आधार क्रमांक संलग्न असलेल्या लाभार्थ्यांनाच डीबीटी योजनेचा लाभ
अनुज्ञेय राहणार आहे.
एपीएल (केशरी) शेतकरी
योजनेतील पात्र शिधापत्रिकाधारकांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी उक्त नमूद
केल्यानुसार आवश्यक ती कागदपत्रे संबंधित रास्त भाव दुकानदार अथवा तहसील कार्यालय
(पुरवठा) विभागाकडे त्वरित उपलब्ध करुन द्यावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र
पापळकर यांनी केले आहे.
*****
No comments:
Post a Comment