02 March, 2023

 

एचआयव्ही सहजीवन जगणाऱ्या व्यक्तींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी

सामाजिक लाभाच्या विविध योजना मिळवून देण्यासाठी सहकार्य करावे

                                               - जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी



 

हिंगोली, (जिमाका) दि. 02 : जिल्ह्यात एचआयव्ही सहजीवन जगणाऱ्या व्यक्तींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सामाजिक लाभाच्या विविध योजना मिळवून देण्यासाठी सर्वच विभागानी पुढाकार घेऊन त्यांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यंवशी यांनी आज आयोजित केलेल्या बैठकीत केले.

आज येथील जिल्हा रुग्णालयातील डापकू सभागृहात एचआयव्ही/एड्स सह जीवन जगणाऱ्या व्यक्तींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जिल्ह्यातील विविध विभाग प्रमुखाची आंतरविभागीय बैठक जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मंगेश टेहरे, डॉ. विठ्ठल करपे, जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजेश येडके, डापकूचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी  ज्ञानेश्वर चौधरी, विविध विभागाचे अधिकारी व त्यांचे प्रतिनिधी, विहान प्रकल्पाचे प्रतिनिधी  उपस्थित होते. 

यावेळी बोलताना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी एचआयव्ही सहजीवन जगणाऱ्या गरजू रुग्णांला मतदान कार्ड, राशन कार्ड, आधार कार्ड यासह विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सहकार्य करावे, असे सांगितले.

एचआयव्ही/एड्स कायदा 2017 एक प्रगतीशील कायदा आहे. यामुळे एचआयव्ही एडस निदान झालेल्या व्यक्तींच्या मानवाधिकार आणि घटनात्मक हक्कांसाठी संरक्षण प्रदान करतो. हा कायदा 10 सप्टेंबर, 2018 रोजी देशात लागू झाला आहे. एचआयव्ही सह जगणाऱ्या विरुध्द भेदभाव, द्ववेषभाव किंवा हिंसा पसरविणे, लोकपालच्या आदेशांचे पालन न करणे, कायदेशीर कार्यवाहीमध्ये गोपनीयतेचे उल्लंघन केल्यास तीन महिने ते दोन वर्षापर्यंत कारावास किंवा जास्तीत जास्त 01 लाख रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा देण्यात येतील. 10 हजार रुपयाचा जास्तीत जास्त दंड आणि अधिक उल्लंघन केल्यास प्रती दिन 5 हजार रुपये दंड याप्रमाणे एक लाख रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे, अशी माहिती जिल्हा कार्यक्रम अधिकारी ज्ञानेश्वर चौधरी यांनी दिली.

तसेच एचआयव्ही संसर्ग हा चार कारणाने होतो. यामध्ये एचआयव्ही संसर्गित रक्त, एचआयव्ही संसर्गित सुई व इंजेक्शन, एचआयव्ही संसर्गित व्यक्तीसोबत असुरक्षित लैंगिक संबंध, एचआयव्हीग्रस्त गरोदर मातेपासून बाळाला एचआयव्ही संसर्ग होण्याचा धोका असतो. मागील पाच वर्षामध्ये एकही एचआयव्ही संसर्गित बालक जन्माला आलेले नाही. जिल्ह्यात आतापर्यंत 4136 एचआयव्ही संसर्ग झालेले व्यक्ती आढळून आलेले आहेत. तसेच 277 गरोदर माता आहेत. या सर्वांना एआरटी औषधोपचारावर ठेवण्यात आलेले आहे. हिंगोली येथे राज्यातील पहिली स्वतंत्र इमारत असलेले एआरटी व डापकू सेंटर असून यासाठी स्वतंत्र इमारत आहे. यामध्ये एचआयव्ही एड्स निदान झालेल्या रुग्णावर उपचार करण्यात येते. येथे त्यांच्यासाठी सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत. विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत, अशी माहिती श्री. चौधरी यांनी बैठकीत सादर केली.

******

No comments: