09 March, 2023

 

अल्पसंख्यांक समाजातील तरुणांनी

निवासी पोलीस शिपाई भरती पूर्व प्रशिक्षणासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 

हिंगोली (जिमाका), दि. 09 :  जिल्ह्यातील अल्पसंख्यांक समाजातील तरुणांसाठी निवासी पोलीस शिपाई भरती पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम 2022-23 अंतर्गत संत नर्सी नामदेव महाराज पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण संस्था, नर्सी-सेनगाव रोडवर नर्सी बसस्टॉप जवळ, पर्यटन केंद्र विभाग, नर्सी नामदेव ता.जि.हिंगोली या संस्थेमार्फत तीन महिन्याचे (90 दिवस) निवासी प्रशिक्षण राबविण्यात येणार आहे. यासाठी इच्छूक अल्पसंख्यांक उमेदवारांनी दि. 15 मार्च, 2023 पर्यंत सकाळी 10.00 ते सायंकाळी 5.00 या वेळेत वरील दिलेल्या संस्थेच्या पत्यावर अर्ज सादर करावेत. त्याअनुषंगाने सविस्तर कागदपत्रासह उमेदवारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. अधिक माहितीसाठी अमोल सोपान पठाडे (मो. नं. 9325662271, 9881244274) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

उमेदवारांच्या निवडीसाठी अटी व शर्ती : उमेदवार अल्पसंख्यांक (मुस्लीम, ख्रिश्चन, बौध्द, पारसी, जैन आणि ज्यू) समाजातील असावा. ज्या उमेदवारांनी या योजनेचा लाभ यापूर्वी घेतला आहे, असे उमेदवार वगळून इतर अल्पसंख्यांक उमेदवारांनी उपरोक्त पत्यावर दि. 17 डिसेंबर, 2021 च्या शासन निर्णयातील प्रपत्र क प्रमाणे अर्ज करावेत. प्रशिक्षणार्थीची वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 8 लाख रुपयापेक्षा जास्त नसावे. याबाबत उमेदवारांने स्वयंघोषित प्रतिज्ञापत्र प्रशिक्षण संस्थेकडे सादर करावे. यापूर्वी उमेदवाराने शासन अनुदानित संस्थेकडून पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण घेतलेले नसावे. उमेदवाराची उंची पुरुष 165 से.मी. व महिला 155 से.मी., छाती पुरुष 79 से.मी. (फुगवून 84 से.मी.) असावी. उमेदवार इयत्ता 12 वी उत्तीर्ण असावा. उमेदवारांनी शैक्षणिक अर्हता, आधार कार्ड, उत्पन्नाचे प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रांच्या सत्यप्रती अर्जासोबत देणे आवश्यक राहील. उमेदवार शारीरिकदृष्ट्या निरोगी व सक्षम असावा. या योजनेत उमेदवाराने एकदा प्रशिक्षण घेतल्यानंतर पुन्हा प्रशिक्षण घेता येणार नाही.

*****

No comments: