02 March, 2023

 

बाल संगोपन योजनेचा लाभ घेण्यासाठी संपर्क साधण्याचे आवाहन

 

हिंगोली (जिमाका), दि. 02 : बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियमानुसार महिला व बाल विकास विभागांतर्गत 0 ते 18 वयोगटातील अनाथ, निराधार, बेघर, अत्यंतिक गरजू, एक पालक, दुर्धर आजाराने ग्रस्त पालकांची बालके अशा काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांना शासन निर्णयान्वये विहित करण्यात आलेल्या निकषानुसार बालकांना शैक्षणिक सहाय्यासाठी बाल संगोपन योजनेचा लाभ देण्यात येतो .

एका कुटुंबातील दोन बालकांना या योजनेचा लाभ घेता येतो. अर्ज केल्यानंतर बाल कल्याण समितीच्या आदेशाने जिल्हा बाल संरक्षण कक्षामार्फत बालकाची सामाजिक तपासणी अहवाल करण्यात येतो. तो अहवाल बाल कल्याण समितीस सादर केल्यानंतर सर्वांगीण परिस्थितीचा विचार करुन लाभार्थ्यास बाल संगोपन योजनेचा लाभ देण्यात येतो.

बाल संगोपन योजना ही महिला व बाल विकास विभागांतर्गत काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांसाठी विनाशुल्क राबविली जाते. या योजनेसाठी महिला व बाल विकास विभागाकडून कोणतेही शुल्क आकारले जात नाही. या योजनेचा लाभ घेण्यासाठी निकषानुसार पात्र लाभार्थ्याच्या पालकांनी आवश्यक कागदपत्राची पूर्तता करुन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, एस-7, दुसरा मजला, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, नांदेड रोड, हिंगोली यांच्याकडे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, हिंगोली यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

******

No comments: