17 March, 2023

 

चला जाणुया नदी अभियानांतर्गत कयाधू नदी संवाद यात्रेचे कोळसा येथे उद्घाटन

नदी विषयी सकारात्मक विचार करणाऱ्या नागरिकांची एक फळी निर्माण करणे गरजेचे

                                                                                                -- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

 



हिंगोली (जिमाका), दि. 17 : नदी विषयी सकारात्मक विचार करणाऱ्या नागरिकांची एक फळी निर्माण करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले.

कयाधू नदीच्या संवाद यात्रेचे उद्घाटन सेनगाव तालुक्यातील कोळसा येथे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी, विभागीय वन अधिकारी बाळासाहेब कोळगे, चला जाणूया नदी राज्य समितीचे सदस्य तथा उगम संस्थेचे अध्यक्ष जयाजी पाईकराव, सरपंच प्रियंकाताई बेंगाळ, नायब तहसीलदार कावरखे, वन परिक्षेत्र अधिकारी शेळके, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रुनवाल, तालुका कृषी अधिकारी वळकुंडे, जलसंधारण अधिकारी बारहाते, जलसंधारण अधिकारी गव्हाणे, बाल विकास प्रकल्प अधिकारी वाकडे आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना जिल्हाधिकारी श्री. पापळकर म्हणाले, नदी विषयी सकारात्मक विचार करणाऱ्या नागरिकांची एक फळी निर्माण करणे गरजेचे आहे. ही फळी कृती आराखडा तयार करण्यासाठी मदतीची ठरेल. नदी डोक्यात जिवंत झाल्याशिवाय पुनर्जीवित होणार नाही. त्यामुळे ही एक चळवळ व्हावी. नदी प्रहरी जनसंवाद यात्रेचा महत्त्वपूर्ण घटक आहे. त्यांनी जाणीव जागृती बरोबर कृती आराखडा तयार करण्यावर भर द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली .

प्रत्येक गावाने पाण्याचा ताळेबंद करणे गरजेचे आहे. ज्यामधून गावामध्ये किती पाणी उपलब्ध आहे व पाणी किती खर्च झाले पाहिजे आणि किती पाणी हे जपून ठेवले पाहिजे. जेणेकरुन गावांमध्ये दुष्काळ येणार नाही. पाणी पाहून पीक पद्धती बदलली पाहिजे. काही पिकांना जास्त प्रमाणात पाणी लागते तर काही पिकांना कमी प्रमाणात पाणी लागते. पाणी जर मुबलक प्रमाणात असेल तर त्या पद्धतीने पीक पद्धती अमलात आणावी, असे त्यांनी सांगितले जलसंधारण होण्यापूर्वी मनसंधारण होणे खूप गरजेचे आहे. जोपर्यंत इच्छाशक्ती बळकट होणार नाही, तोपर्यंत पाणी विषयावर पाहिजे तसे काम होणार नाही. त्यामुळे सर्वांनी एकत्र येणे आवश्यक आहे, असे उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांनी मनोगतात व्यक्त केले.

जल योद्धा जयाजी पाईकराव यांनी प्रास्ताविकात कयाधू नदी ही  तीव्र उताराची नदी असल्याने परतीचा पाऊस गेल्यानंतर या नदीचा प्रवाह कमी कमी होत जातो. ही नदी पुनर्जीवित करण्यासाठी पडलेला पावसाचा थेंब हा जमिनीत मुरवणे खूप गरजेचे आहे. तोच पाऊस आपल्याला व्यवस्थापन करुन वापरायला हवा म्हणजे हिंगोली जिल्ह्यांमध्ये पडणारा सततचा दुष्काळ याला आळा बसू शकेल, असे सांगितले.

पाणी आणि सामाजिक विषयावर महाराष्ट्राचे ख्यातनाम शाहीर धम्मानंद इंगोले व त्यांच्या संचांनी  प्रबोधन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकास कांबळे यांनी केले, तर वन परिक्षेत्र अधिकारी शेळके यांनी आभार व्यक्त केले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी दिशांत पाईकराव, श्री. चातूर्मुखी विनायक शाळेचे शिक्षक वृंद, श्याम संगेवर, रजनी चित्तेवार, प्रतिभा पवार उपस्थित होते.  

            कयाधू नदीची जनसंवाद यात्रा ही कोळसा, सेनगाव, ब्रह्मपुरी, नर्सी ना, देऊळगाव, बेलवाडी, समगा, वसई, नांदापुर, कोंढुर, येलकी, बाळापूर मार्गे जाणार असून शेवाळा येथे समारोप होणार आहे.

*****

No comments: