20 March, 2023

 

जिल्हास्तरीय युवा उत्सव उत्साहात साजरा

 



हिंगोली (जिमाका), दि. 20 : नेहरु युवा केंद्र युवा कार्यक्रम खेळ मंत्रालय भारत सरकारच्या वतीने बाबूराव पाटील महाविद्यालयात नुकतेच जिल्हास्तरीय युवा उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. हा युवा उत्सव देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी प्रसंगी सांगितलेल्या आपल्या भाषणातील अमृत  कालच्या पंचप्राणावर आधारित होता. या युवा उत्सवाची थीम विकसित भारत का निर्माण ही होती. त्या आधारावर हा युवा उत्सव हिंगोली जिल्ह्यात उत्सवामध्ये पार पडला. या युवा उत्सवात युवकांसाठी विकसित भारत का निर्माण या विषयावर युवा कलाकार चित्रकला स्पर्धा, भाषण स्पर्धा, कविता स्पर्धा, मोबाईल फोटोग्राफी स्पर्धा, सांस्कृतिक लोक नृत्य स्पर्धा अशा विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद व माँ सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन करुन तसेच राज्यगीताने या स्पर्धेचे उद्घाटन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाऊराव पाटील गोरेगावकर हे होते. यावेळी डॉ. विजय निलावार, प्रा.डॉ.सुधीर वाघ हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

नेहरु युवा केंद्राच्या माध्यमातून युवकांच्या कलागुणांना जिल्हा, राज्य व राष्ट्र पातळीवर वाव मिळत आहे. हिंगोली नेहरु युवा केंद्राच्या माध्यमातून अत्यंत चांगले कार्य सुर आहे. युवकांनी मातृभाषा व राष्ट्रभाषेचा सन्मान करावा. आपली राष्ट्रभाषा ही हिंदी असून मराठी भाषिकांनी ती आत्मसात करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात  जिल्हा युवा अधिकारी आशिष पंत यांनी प्रत्येक देशाच्या विकासाचा कणा हा युवक आहे. युवाशक्ती ही राष्ट्र शक्ती आहे. देश विकासात युवकांची भूमिका महत्वपूर्ण आहे. देशात युवकांची संख्या मोठी असल्याने जगात भारत देश महासत्ता होण्याच्या मार्गावर आहे. प्रत्येक युवकाने मला देशाने काय दिले हा प्रश्न विचारण्यापेक्षा मी देशासाठी काय केले ही भूमिका स्वीकारुन देशाच्या सर्वांगीण विकासात हातभार लावावा, असे आवाहन केले .

तसेच युवा उत्सवाच्या समारोप प्रसंगी माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर व समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त शिवानंद मिनगीरे यांनी नेहरु युवा केंद्र हे युवकांसाठी खूप चांगल्या पध्दतीने काम करीत आहे. युवकांच्या कल्याणासाठी त्यांना प्रोत्साहन देण्याचे कार्य करीत आहे, असे सांगितले.

युवा उत्सवामध्ये घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये विजयी झालेल्या युवक व युवतीना समारोप प्रसंगी पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.

युवा उत्सवाचे संचालन नेहरु युवा केंद्राचे तालुका युवा समन्वयक प्रवीण पांडे यांनी केले तर अनिल बिरगे यांनी आभार प्रदर्शन केले. यावेळी विद्यार्थिंनी युवा महोत्सवामध्ये आपल्या संस्कृती व परंपरेवर आकर्षक नृत्य सादर करुन उपस्थितांची मने जिंकली. राष्ट्रगीतांनी युवा महोत्सवाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नेहरु युवा केंद्राचे तालुका युवा समन्वयक, कै.बाबूराव पाटील महाविद्यालय, हिंगोली यांनी परिश्रम घेतले.   

*****

No comments: