03 January, 2024

 आता कल चाचणीच्या आधारावर निवडता येणार आपले आवडते क्षेत्र

 

हिंगोली (जिमाका), दि. 03 :  केंद्र व राज्य शासनाने देशातील विविध जिल्ह्यात मॉडेल करिअर सेंटर स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. हिंगोली जिल्ह्यातील जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, हिंगोली कार्यालयात मॉडेल करिअर सेंटरची स्थापना करण्यात आलेली आहे. यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना दहावी, बारावी, पदवी, पदविका शिक्षण झाल्यानंतर नेमके कोणते क्षेत्र निवडावे याबाबत संभ्रम निर्माण होत असतो. योग्य मार्गदर्शन मिळाले नाही तर अनेक संधींना मुकावे लागते. या पर्यायाने बेरोजगार राहण्याची वेळ येते. त्यामुळेच शासनाकडून करिअरची संधी मिळावी यासाठी कल चाचणीच्या माध्यमातून त्यांच्या मनात असणाऱ्या करिअरचा शोध घेऊन हवे ते क्षेत्र निवडण्यास मदत व्हावी यासाठी जिल्हास्तरावर मॉडेल करिअर केंद्रामार्फत विद्यार्थ्यांना मोफत कल चाचणी व त्या आधारावर करिअर निवडणे सोपे होईल.

मॉडेल करिअर केंद्रामार्फत रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन, मोफत कल चाचणी, नोकरी मार्गदर्शन, रोजगार मेळावे, सुसज्ज संगणक कक्ष, सुसज्ज लायब्ररी, देशात व देशाबाहेर रोजगारांसाठी संधी आदी कार्यक्रम राबविण्यात येतात. तसेच जिल्ह्यातील युवक, युवतींसाठी कौशल्य विकास कार्यालयामार्फत पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येते. दर महिन्यांच्या दुसऱ्या व चौथ्या बुधवारी प्लेसमेंट ड्राईव्ह घेण्यात येते. यामध्ये विविध नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधींना कार्यालयात बोलावून त्यांच्याकडे असलेल्या रिक्तपदांनुसार सुशिक्षित बेरोजगार युवक, युवतींना रोजगार व स्वयंरोजगार उपलब्ध करुन दिले जाते, अशी माहिती डॉ. रा. म. कोल्हे, सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, हिंगोली यांनी दिली आहे.

***** 

No comments: