05 January, 2024

 

एचआयव्ही संसर्गित व्यक्तीं व देहविक्री करणाऱ्या महिलांचे

सामाजिक लाभाच्या योजनांचे प्रस्ताव तात्काळ निकाली काढावेत

                                                        - अपर जिल्हाधिकारी खुशाल सिंह परदेशी

 



हिंगोली (जिमाका), दि. 05 : एचआयव्ही संसर्गित व्यक्तींना व देहविक्री करणाऱ्या महिलांना देण्यात येणाऱ्या सामाजिक लाभाच्या योजनांचे प्रस्ताव संबंधित विभागानी तात्काळ निकाली काढावेत, अशा सूचना अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी दिल्या.

आज येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण समितीची त्रैमासिक आढावा बैठक अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मंगेश टेहरे, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश रुणवाल, समाज कल्याण अधिकारी राजू एडके, सहायक माहिती अधिकारी चंद्रकांत कारभारी, कामगार अधिकारी टी. ई. कराड, जिल्हा कार्यक्रम अधिकारी ज्ञानेश्वर चौधरी, एआरटीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश कोठुले, नायब तहसीलदार बोथीकर, तहसील कार्यालयातील प्रतिनिधी, विहानच्या श्रीमती अलका रणवीर, सेतूचे इरफान कुरेशी, घुगे तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी जिल्हा कार्यक्रम अधिकारी ज्ञानेश्वर चौधरी यांनी जिल्ह्यातील एचआयव्ही/एड्स कार्यक्रमाच्या कामाचा अहवाल सादर केला. हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 4160 सामान्य गटातील रुग्णांची व 275 गरोदर महिलांची एआरटी केंद्रात नोंद झालेली आहे, तर एकूण 3791 रुग्णांची एआरटी केंद्रात नोंदणी झाली असून त्यापैकी 1920 रुग्णांना औषधोपचार सुरु आहेत. तसेच मागील त्रैमासिकात एकूण 20 सामान्य गटातील तर 01 गरोदर महिला संसर्गित असून त्या सर्वांची एआरटी नोंदणी झालेली असल्याची माहिती दिली.  

जिल्ह्यातील आयएमए अंतर्गत असलेल्या सर्व नर्सिंग हॉस्पिटल व प्रयोगशाळेच्या ठिकाणी पीपीपी तत्वावर आयसीटीसी सुरु करण्यासाठी श्री. परदेशी यांनी डॉ सचिन बगडीया यांना सूचित केले.

बैठक यशस्वितेसाठी आशिष पाटील, संजय पवार व टिना कुंदणानी यांनी सहकार्य केले.

*******

No comments: