19 January, 2024

 

शेवाळा येथे जिल्हा बाल संरक्षण कक्षामार्फत बाल कायद्यांची जनजागृती

 


हिंगोली (जिमाका), दि. 19 : जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी आर. आर. मगर यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांच्या नियोजनानुसार मौजे शेवाळा येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळा व केंद्रीय कन्या प्रशाला येथे बाल कायद्यांबाबत जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.

या कार्यक्रमात बाल विवाह म्हणजे काय, विवाहाचे योग्य वय, बाल विवाह होण्याचे अनेक कारणे आहेत जसे की, कुटुंबाचे स्थलांतर, आर्थिक परिस्थिती, कुटुंबातील मुलींचे जास्‍त प्रमाण, वडिलांची व्यसनाधिनता इ. बाल विवाहामुळे होणारे दुष्परिणाम, बाल विवाह केल्यास किंवा बाल विवाहाच्या कार्यात सहभागी झाल्यास एक लाख रुपये दंड व दोन वर्षे सक्त मजुरीची शिक्षा आहे. या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी ग्रामीण भागासाठी ग्रामसेवक आणि शहरी भागासाठी बाल विकास प्रकल्प अधिकारी यांना बाल विवाह प्रतिबंधक अधिकारी नियुक्त करण्यात आलेले आहेत. तसेच त्यांना सहायक म्हणून अंगणवाडी सेविका असतात. या सर्वांनी आपापल्या कार्यक्षेत्रात बालविवाह होणार नाही याबाबत योग्य ती खबरदारी घ्यावी. तसेच लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण अधिनियम 2012 बाबत जिल्हा बाल संक्षरण कक्षातील कायदा व परिविक्षा अधिकारी ॲड. अनुराधा पंडित यांनी माहिती दिली.

तसेच महिला व बाल विकास विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेविषयी आणि आपल्या सभोवताली कुठेही बाल विवाह होत असेल तर चाईल्ड हेल्पलाईन 1098 या टोल फ्री क्रमांकावर माहिती दिली पाहिजे. 1098 हा बालकांसाठी तात्काळ मदत करणारी हेल्पलाईन आहे. 1098 या टोल फ्री क्रमांकावर मिळालेली माहिती ही गोपनीय असते, असे प्रतिपादन चाईल्ड हेल्पलाईनचे केस वर्कर तथागत इंगळे यांनी केले. यावेळी सर्व उपस्थितांना बाल विवाह  प्रतिबंध प्रतिज्ञेची शपथ देण्यात आली.  

 या कार्यक्रमासाठी मौजे शेवाळा येथील तलाठी आर. डी. गिरी, मुख्याध्यापक जमजाळ, मुख्याध्यापक आडे, शिक्षक डोके, बोलके, सुर्यवंशी, व्यवहारे, तेल्लावार, अनुराधा व्यवहारे, पोलीस पाटील स्वप्नील गांजरे व शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

******

No comments: