जिल्ह्यातील
सर्व पेट्रोलपंप सुरळीत सुरु करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील
हिंगोली (जिमाका), दि. 02 : भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, हिंदुस्थान पेट्रोलियम व
इंडियन ऑईल कार्पोरेशन या तेल कंपन्यांच्या रिफायनरीमध्ये एलपीजीची वाहतूक करणारे
वाहनचालक तसेच इतर पेट्रोलियम पदार्थांची वाहतूक करणारे वाहतुकदार यांनी संप
पुकारला आहे. त्यामुळे पेट्रोल, डिझेल व इतर पेट्रोलजन्य पदार्थ यांच्या सार्वजनिक
वितरण व्यवस्थेवर परिणाम होऊन सामान्य नागरिकांची गैरसोय होण्याची शक्यता नाकारता
येत नाही. यासाठी जिल्ह्यातील भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडचे 19,
हिंदुस्थान पेट्रोलियमचे 21 व इंडियन ऑईल कार्पोरेशनचे 19 असे एकूण 59 पेट्रोलपंप
कार्यरत आहेत. वरील तिन्ही पेट्रोल कंपन्यांच्या समन्वयकाशी संपर्क साधला असून पेट्रोल
व डिझेलचा पुरवठा सुरळीत सुरु करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे.
आज जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी
जिल्ह्यातील सर्व तहसीलदार, पेट्रोलपंप चालक संघटना यांच्या प्रतिनिधींशी तातडीने
बैठक घेवून पेट्रोलपंप सुरळीत सुरु करण्यासाठी सुचना दिल्या आहेत. यावेळी
जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी श्री. पापळकर यांनी तालुकानिहाय पथके तयार
करण्याच्या सुचना देवून या पथकामार्फत कोठेही काळाबाजार होणार नाही यासाठी लक्ष
ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
वरील सर्व कंपन्यांच्या रिफायनरीमध्ये एलपीजीची वाहतूक करणारे
वाहनचालक व वाहतूकदार यांच्याकडून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये तसेच कायदा व
सुव्यवस्थेमध्ये कुठल्याही प्रकारची बाधा येऊ नये तसेच पेट्रोलपंप व एलपीजी
वितरणाच्या ठिकाणी तसेच पेट्रोल, डिझेल व एलपीजी वाहतुक करणा-या वाहनांना कायदा व
सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी आवश्यक पोलीस संरक्षण पुरविण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत कुठलाही
अनुचित प्रकार घडल्यास अत्यावश्यक वस्तू अधिनियम, 1955 अंतर्गत जीवनावश्यक वस्तू
म्हणून अंतर्भाव होत असल्याने संबधित अधिनियमांतर्गत आवश्यक ती कार्यवाही
करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, हिंगोली यांनी संबंधितांना
दिलेल्या आहेत. या आदेशाचे उल्लंघन
करणा-या व्यक्ती, संस्था अथवा संघटना यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे
कलम 51 तसेच भारतीय दंड सहिता (45ऑफ 1860) कलम 188 मधील तरतुदीनुसार दंडनिय
कायदेशीर कार्यवाही करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी श्री.
पापळकर यांनी आदेशाद्वारे दिले आहेत. *******
No comments:
Post a Comment