09 January, 2024

 पोलीस स्थापना दिनानिमित्त बाल कायद्याची जनजागृती

                                                                                                             

हिंगोली (जिमाका), दि. 09 : कुरुंदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन मोरे आणि जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांच्या नियोजनानुसार वसमत तालुक्यातील कुरुंदा येथील नरहर कुरुंदकर विद्यालयात पोलीस स्थापना दिनानिमित्त बाल कायद्यांची जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.

या कार्यक्रमात कुरुंदा पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक श्रीधर वाघमारे यांनी विद्याथ्यांसोबत खेळीमेळीच्या वातावरणात संवाद साधला. यावेळी विद्यार्थ्यांना संकटकालीन परिस्थिती निर्माण झाल्यास पोलीस मतद क्रमांक 112 डायल करुन तात्काळ मदत मिळवू शकतो याविषयी सखोल मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांनी स्वत:ची काळजी कशी घ्यावी, नियमित शाळेत येणे आणि भविष्याच्या दृष्टीने अभ्यासावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी मार्गदर्शन केले.

जिल्हा बाल संरक्षण कक्षातील कायदा तथा परिविक्षा अधिकारी ॲड. अनुराधा पंडित यांनी विद्यालयातील विद्यार्थ्यांना बाल विवाह म्हणजे काय, बालविवाह होण्याचे अनेक कारणे जसे कुटुंबाचे स्थलांतर, आर्थिक परिस्थिती, कुटुंबातील मुलींचे जास्त प्रमाण, वडिलांची व्यसनाधिनता, बालविवाह होण्याचे प्रमुख कारणे याविषयी तसेच बालविवाहाचे दुष्परिणाम, बाल विवाह प्रतिबंधक अधिनियम, 2006 नुसार मुलीचे वय 18 व मुलाचे वय 21 वर्षापेक्षा कमी वय असणारे विवाह हे बेकायदा ठरतात. या विरोधात गुन्हा नोंदविला जातो. अशा गुन्ह्यास एक लाख रुपये दंड व दोन वर्षे सक्त मजुरीची शिक्षा असल्याची माहिती दिली.

आपल्या सभोवताली कोठेही बालविवाह होत असेल तर चाईल्ड हेल्पलाईन 1098 या टोल फ्री क्रमांकावर माहिती दिली पाहिजे. 1098 हा बालकांसाठी तात्काळ मदत करणारी हेल्पलाईन आहे. 1098 या टोल फ्री क्रमांकावर मिळालेली माहिती गोपनीय असते, अशी माहिती चाईल्ड हेल्पलाईन 1098 चे केस वर्कर तथागत इंगळे यांनी दिली.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयातील शिक्षक डी. व्ही. भोसले यांनी केले. आभार विद्यालयाचे मुख्याध्यापक बी. बी. म्हेत्रे यांनी मानले. या कार्यक्रमात कुरुंदा पोलीस स्टेशनचे पोलीस शिपाई विकास राठोड, विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*******

No comments: