05 January, 2024

 

मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या अमृत महोत्सवानिमित्त केलेले काम

भावी पिढीला प्रेरणा देणारे ठरेल

                                                        - जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

 




हिंगोली (जिमाका), दि. 05 : मराठवाडा मुक्ती संग्रामाचा जाज्वल्य इतिहास आहे. स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या या स्वातंत्र्यसंग्रामात अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी त्याग व बलिदान केले, अशा उपेक्षित स्वातंत्र्यसैनिकांची ओळख भावी पिढींना व्हावी व त्यातून राष्ट्र प्रेमाची प्रेरणा मिळावी या उद्देशाने शासनामार्फत मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अनुषंगाने विविध  कार्यक्रम राबविण्यात आले होते.  हे काम केलेले काम स्वातंत्र्य सैनिकांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी केलेले कर्तव्य हे भावी पिढीला प्रेरणा देणारे ठरेल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले.

मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त स्वातंत्र्यसैनिकांच्या शौर्य गाथेला सुवर्ण उजाळा दिल्याबद्दल जिल्हा प्रशासनातील सर्व अधिकाऱ्यांचा गौरव करण्यासाठी स्वातंत्र्यसेनानी उत्तराधिकारी समितीच्या वतीने आयोजित कृतज्ञता सोहळा जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात घेण्यात आला. यावेळी गौरव सोहळ्याला उत्तर देताना जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आद्य स्वातंत्र्य सेनानी कृष्णाजी देशमुख यांचे वंशज व ज्येष्ठ लेखक डॉक्टर साहेबराव देशमुख नांदापूरकर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून उदय वाईकर, ॲड.जी. आर. देशमुख हे उपस्थित होते.

स्वातंत्र सैनिकांच्या बलिदानाचा इतिहास भावी पिढींना प्रेरणादायी ठरावा यासाठी स्वातंत्र सैनिकाच्या घरावर स्वातंत्र्यसैनिकांचे निवास अशी पाटी लावण्याचा उपक्रमामुळे त्या गावाला, त्या घराला नवीन ओळख देण्याचे व त्यातून जाज्वल इतिहासाचे स्मरण पाटी पाहून होते, असेही जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी सांगितले.

अध्यक्षीय भाषणात डॉ. साहेबराव देशमुख यांनी स्वातंत्र्यापूर्वीची राजकीय व सामाजिक स्थिती व विद्यमान वास्तवाबाबत सर्वांनी आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले.

यावेळी स्वातंत्र्य सैनिक पाल्य संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, अप्पर जिल्हाधिकारी खुशाल सिंह परदेशी, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर जाधव, डॉ. दीपक साबळे, आम्रपाली चोरमारे, पुरी यांचा मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेचे पूजन करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. स्वागत गीत विद्यासागर विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी केले

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय टाकळगव्हाणकर यांनी केले. सूत्रसंचालन विठ्ठल सोळंके व अर्चना मेटे यांनी केले. तर आभार भूषण देशमुख नांदापूरकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वातंत्र्य सैनिक पाल्य संघटनेचे शिवचंद्र देशमुख किल्ले वडगावकर, वामन टाकळगव्हाणकर, श्रीराम टाकळगावकर, विश्वास देशमुख भगवतीकर आदीसह विद्यासागर विद्यालय खानापूर चित्ता, महावीर मराठी हायस्कूल पिंपळदरी, बालाजी विद्यालय वाई व संत सेवालाल महाराज विद्यालय पळसोना येथील शिक्षक कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

*******

No comments: