नसरतपूर येथे सोयाबीन पीक कापणी; जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या उपस्थितीत कापणी प्रयोग
हिंगोली, दि. ८ (जिमाका) : प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम २०२६ साठी मौजे नसरतपूर, ता. वसमत येथे आज सोयाबीन पिकाची कापणी करण्यात आली. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या प्रमुख उपस्थितीत पीक कापणी प्रयोगाची प्रक्रिया पार पडली.
शेतातील १० मीटर बाय १० मीटर क्षेत्र निश्चित करून त्यातील सोयाबीनची कापणी व मळणी करण्यात आली. मिळालेल्या उत्पादनाचे वजन करण्यात आले. या नोंदीच्या आधारे पीक उत्पादनाचा अंदाज निश्चित केला जातो. तसेच पीक विमा नुकसानभरपाई निश्चित करण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो.
जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी पीक कापणी प्रक्रियेची प्रत्यक्ष पाहणी करून संपूर्ण कार्यपद्धतीची माहिती घेतली. शासनाच्या विहित कार्यपद्धतीनुसार आणि पारदर्शक पद्धतीने ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
यावेळी उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसीलदार सारंग चव्हाण, नायब तहसीलदार डॉ.विनोद डोणगावकर, पीक विमा कंपनीचे प्रतिनिधी, मंडळ अधिकारी, तलाठी, मंडळ कृषी अधिकारी, कृषी सहायक तसेच संबंधित शेतकरी उपस्थित होते.
या पीक कापणी प्रयोगाचा सविस्तर अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करण्यात येणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी विकास माने यांनी दिली.
***

No comments:
Post a Comment