जिल्हा आरोग्य अधिकारी यांची प्राथमिक आरोग्य केंद्र हट्टा येथे भेट; आरोग्य सेवांचा घेतला सविस्तर आढावा
हिंगोली (७ ऑक्टोंबर): राज्य शासनाच्या 'सेवा संकल्प अभियाना'च्या पार्श्वभूमीवर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके यांनी आज प्राथमिक आरोग्य केंद्र हट्टा येथे अचानक भेट देऊन पाहणी केली. यावेळी, त्यांनी नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा पुरवण्याचे निर्देश आरोग्य अधिकाऱ्यांना दिले.
प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्वप्रथम विविध विभागांना भेटी दिल्या. यामध्ये प्रामुख्याने औषधी भांडार मध्ये आवश्यक औषधांचा साठा उपलब्ध आहे की नाही याची खात्री केली. प्रसूती कक्ष व प्रयोगशाळा स्वच्छता, उपकरणांची स्थिती व पॅथॉलॉजी चाचण्यांच्या सुविधेची पाहणी केली.
पाहणीदरम्यान, उपचार घेण्यासाठी आलेल्या चिमुकल्यांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्व रुग्णांची जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके यांनी अत्यंत आस्थेने विचारपूस केली. आरोग्य केंद्रात योग्य उपचार मिळतात का, औषधे वेळेवर मिळतात का, याची थेट रुग्णांकडूनच माहिती घेतली.
"तिशीचा पल्ला, तपासणी अन् सल्ला" ३० वर्षांवरील नागरिकांच्या असंसर्गजन्य आजारांच्या तपासणी मोहिमेचा आढावा घेतला.
प्राथमिक आरोग्य केंद्राला 'राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानक' दर्जा प्राप्त करून देण्यासाठी प्राधान्य क्रमाने आवश्यक सुधारणा व कामे पूर्ण करण्याचे निर्देश दिले.
या वेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदीप काळे, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सिद्दिकी यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment