08 October, 2026

शेतपिकांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करा -जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

 शेतपिकांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करा

-जिल्हाधिकारी राहुल गुप्ता 


▶️ई-पीक पाहणीचे काम १० ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करा

▶️जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली वसमत येथे महसूल अधिकाऱ्यांची बैठक

         हिंगोली, दि. ८ (जिमाका) : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीचे परिपूर्ण पंचनामे तातडीने पूर्ण करावेत. या कामास सर्वोच्च प्राधान्य द्यावे. तसेच ई-पीक पाहणीचे काम १० ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

         जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली वसमत तहसील कार्यालय येथे तालुक्यातील सर्व मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी यांची महसूल विषयक कामकाजाच्या अनुषंगाने बैठक घेण्यात आली. यावेळी विविध महसूल विषयक कामांचा जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आढावा घेतला.

        बैठकीस उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड, उपजिल्हाधिकारी राजेश सरोदे, उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसीलदार सारंग चव्हाण, नायब तहसीलदार विनोद डोणगावकर, पुरवठा निरीक्षण अधिकारी पी. जी. हांडे, उपअधीक्षक भूमिअभिलेख श्री. गुरव तसेच तालुक्यातील सर्व मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी व कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.

        बैठकीत नोंदणीकृत व अनोंदणीकृत ई-फेरफार प्रलंबित अहवाल, डीएसडी डेटा साईन न झालेला ७/१२ अहवाल, घोषणापत्र-८ झालेल्या गावांचा अहवाल, ई-हक्क प्रणालीतील अर्जांचे एमआयएसमध्ये रूपांतर, शासकीय वसुली व नियोजन, शासकीय जमिनीवरील शर्तभंग प्रकरणे, भोगवटादार वर्ग-२ चे वर्ग-१ मध्ये रूपांतरण तसेच इतर प्रलंबित कामांचा  जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सविस्तर आढावा घेऊन अधिकाऱ्यांना प्रलंबित कामे विहित मुदतीत पूर्ण करण्याच्या सूचना केल्या.

                                                                                        ***

No comments: