व्यसनमुक्त भारत आणि संविधानिक मूल्यांबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
हिंगोली, दि. 26 नोव्हेंबर (जिमाका) : तालुका विधी सेवा समिती, हिंगोली यांच्यावतीने व्यसनमुक्त भारत अभियानांतर्गत अंमली पदार्थ जनजागृती, आरोग्य मार्गदर्शन व संविधान दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन 26 नोव्हेंबर 2026 रोजी रामकृष्णा विद्या मंदिर, हिंगोली येथे करण्यात आले.
हा कार्यक्रम तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्रीकांत एल. आणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधिज्ञ तथा जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष एस. आर. घुगे होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा वकील संघाचे प्रशिक्षित मध्यस्थ तथा ज्येष्ठ विधिज्ञ एन. एस. घुगे उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून सहायक पोलीस निरीक्षक दीपक मस्के तसेच रामकृष्णा विद्या मंदिरच्या मुख्याध्यापिका ए. एन. बनसोडे उपस्थित होते.
प्रमुख मार्गदर्शक एन. एस. घुगे यांनी विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीविषयी मार्गदर्शन करताना अंमली पदार्थ व विविध व्यसनांमुळे शरीरावर होणारे दुष्परिणाम स्पष्ट केले. व्यसन शरीरासाठी हानिकारक असल्याची जाणीव असूनही अनेक जण व्यसनाधीन होतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी स्वतः व्यसनांपासून दूर राहावे तसेच आपल्या कुटुंबातील सदस्य, मित्र अथवा परिचित व्यक्ती व्यसनाधीन असल्यास त्यांना व्यसनाचे दुष्परिणाम समजावून सांगून व्यसनमुक्त होण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन त्यांनी केले.
प्रमुख पाहुणे दीपक मस्के यांनी भारतीय संविधानाची पार्श्वभूमी, संविधानाची रूपरेषा व नागरिकांना प्राप्त अधिकारांविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून समाजातील वंचित, उपेक्षित घटक, महिला, बालक व बहुजन समाजाला समान अधिकार आणि न्याय मिळवून देण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. संविधानामुळे समाजातील विषमता दूर करण्यासाठी आणि प्रत्येक नागरिकाला समानतेचा अधिकार प्राप्त होण्यासाठी भक्कम आधार मिळाला आहे, असे त्यांनी सांगितले.
मुख्याध्यापिका ए. एन. बनसोडे यांनी मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांनी बालवयातच व्यसनांपासून दूर राहून आरोग्यदायी जीवनशैली अंगीकारावी. तसेच आपल्या आजूबाजूच्या व्यसनाधीन व्यक्तींना व्यसनमुक्त करण्यासाठी जागरूकता निर्माण करावी, असे आवाहन केले.
अध्यक्षीय समारोपात एस. आर. घुगे यांनी विद्यार्थ्यांना संविधानातील मूल्ये, अधिकार आणि कर्तव्यांचे महत्त्व समजावून सांगितले. तसेच व्यसनमुक्तीसाठी राज्य विधी सेवा प्राधिकरण व विधी सेवा समित्यांच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या कार्याची माहिती दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एम. ए. कांबळे, सचिव, जिल्हा वकील संघ, हिंगोली यांनी केले, तर आभारप्रदर्शन डी. एन. जगताप, शिक्षिका, रामकृष्णा विद्या मंदिर यांनी केले. तालुका विधी सेवा समितीचे वरिष्ठ लिपिक डी. बी. हनवते व कनिष्ठ लिपिक एन. एस. दिंडे यांनी शाळेतील सहशिक्षक संदीप भुक्तर व कर्मचारी यांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडला.
No comments:
Post a Comment