संविधान दिनानिमित्त विद्यार्थ्यांना संविधान सभा, मूलभूत हक्क व कर्तव्यांविषयी मार्गदर्शन
हिंगोली, दि. 26 नोव्हेंबर (जिमाका) : भारतीय संविधानाने नागरिकांना दिलेले मूलभूत हक्क, स्वातंत्र्य आणि समानतेच्या मूल्यांसोबत प्रत्येकाने आपल्या कर्तव्यांची जाणीव ठेवून जबाबदार नागरिक म्हणून योगदान द्यावे. संविधानातील न्याय, स्वातंत्र्य, समता व बंधुता ही मूल्ये जीवनात अंगीकारावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने संविधान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी विद्यार्थ्यांना संविधान सभा निर्मिती, संविधानाचे महत्त्व, मूलभूत हक्क व कर्तव्ये याविषयी मार्गदर्शन केले. संविधान हा देशाच्या लोकशाही व्यवस्थेचा आधार असून, त्यातील मूल्यांचा आदर व आचरण प्रत्येक नागरिकाने करणे आवश्यक आहे. संविधानिक मूल्यांच्या माध्यमातून सामाजिक समता, बंधुता आणि न्याय प्रस्थापित करण्यासाठी नागरिकांनी सजग राहावे, असे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासन निर्णयानुसार, संविधान दिनानिमित्त सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण गीता गुठ्ठे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांची व कर्मचारी रॅली आयोजित करण्यात आली. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या हस्ते रॅलीला हिरवी झेंडी दाखवून प्रारंभ करण्यात आला. सरजूदेवी भिकूलाल आर्य कन्या शाळेपासून सुरू झालेली रॅली भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर व संविधान चौक येथे पोहोचली.
रॅलीदरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, महात्मा गांधी, इंदिरा गांधी, अग्रसेन महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच संविधान उद्देशिकेचे वाचन व विविध संविधानपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत जिल्ह्यातील सर्व शासकीय मुला-मुलींच्या वसतिगृहांमध्येही संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. वसतिगृहांमध्ये संविधान उद्देशिका प्रदर्शित करण्यात आली आणि विद्यार्थ्यांसमवेत तिचे सामूहिक वाचन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण गीता गुठ्ठे यांनी केले, तर सूत्रसंचालन समतादूत सुरेश पठाडे यांनी केले. कार्यक्रमास सुमारे 500 ते 600 विद्यार्थी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

No comments:
Post a Comment