जागतिक तंबाखू विरोधी दिन
जागतिक तंबाखू विरोधी दिन दरवर्षी 31 मे रोजी सर्वत्र
साजरा केला जातो. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करण्यापासून लोकांना
रोखण्याचा हा दिवस. या निमित्ताने तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थामुळे होणाऱ्या
जीवघेण्या परिणामांची माहिती देणारा हा लेख.
तंबाखू
व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणारे लोक आपल्या आजूबाजूला सर्वत्र दिसून येतात.
घर, कार्यालये तसेच सार्वजनिक ठिकाणी तंबाखू खाणारी व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन
करणारी व धुम्रपान करणारी मंडळी दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
दरवर्षी
जागतिक आरोग्य संघटनेच्या माध्यमातून तंबाखू नियंत्रणासाठी वेगवेगळे विषय घेऊन
वर्षभर कार्य केले जाते. तंबाखूचे होणारे शारीरिक, मानसिक, पर्यावरण विषयक आणि
सामाजिक तोटे लक्षात घेऊनच जागतिक आरोग्य संघटना दरवर्षी तंबाखूला रोखण्यासाठी
वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करत असते. यावर्षी 31 मे जागतिक तंबाखू विरोधी
दिनानिमित्त जागतिक आरोग्य संघटनेतर्फे
‘‘आपल्याला अन्न हवे आहे, तंबाखू नाही’’ ही थीम निवडण्यात आली आहे. वर्ष 2023 च्या
जागतिक तंबाखू विरोधी मोहिमेचे उद्दिष्ट तंबाखू उत्पादक शेतकऱ्यांसाठी पर्यायी पीक
उत्पादन आणि विपणनाच्या संधीबद्दल जागरुकता वाढवणे आणि त्यांना शाश्वत, पौष्टिक
पिके घेण्यास प्रोत्साहित करणे आहे. तसेच युवा आणि प्रोढ वर्गाने देखील पुढाकार
घेऊन तंबाखूला नाकारुन आपले जीवन आरोग्यदायी जगावे हा देखील एक हेतू आहे. यावर्षी
देखील आपण सर्वांनी मिळून ‘‘आपल्याला अन्न हवे आहे, तंबाखू नाही’’ या विषयावर अधिक
कार्य करावयाचे आहे.
तंबाखूचे
सेवन केल्याने तोंडाचा कर्करोग होतो आणि संपूर्ण जगामध्ये भारत देशात सर्वाधिक मुख
कर्करोगाचे रोगी आढळून आलेले आहेत. तंबाखू ही इतर सर्व रोगांची जननी आहे. आज
संपूर्ण भारत देशात 28.6 टक्के प्रौढ तंबाखूचे सेवन करत आहेत. तर महाराष्ट्र
राज्यात प्रौढ व्यक्तीचे तंबाखू सेवन करण्याचे प्रमाण जवळपास 26.6 टक्के आहे.
मुलांचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये जवळपास 5.1 टक्के युवक (13 ते 15 वयोगट)
हे तंबाखूचे सेवन करत आहेत. सिगारेटच्या धूम्रपानाने हवा दूषित होते आणि तंबाखू
सेवन केल्याने वातावरण प्रदूषित होते. या सर्व बाबी लक्षात घेऊनच सलाम मुंबई
फाऊंडेशनच्या माध्यमातून 2007-08 मध्ये तंबाखूमुक्त शाळा अभियान सुरु करण्यात
आलेले आहे.
तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम :
देशात
बिडी, गुटखा, तंबाखू, सिगारेट, मावा, खैनी, मिसरी, चिलम, हुक्का, तंबाखू मिश्रित
पान, तपकीर यासारख्या तंबाखूच्या पदार्थांचे व्यसन मोठ्या प्रमाणात केले जाते.
तंबाखू
सेवनामुळे हृदयरोग, कर्करोग, यकृताचा आजार, फुफ्फुसाचे आजार, टि.बी. यासारख्या
प्राणघातक आजारांना बळी पडतात. पक्षाघात, मोतीबिंदू, नपुंसकत्व, कमी वजनाचे व्यंग
असलेले-मृत्यू पावलेले बाळ जन्माला येणे, केसांना दुर्गंधी येऊन केस गळणे,
डोळ्याखाली काळी वर्तुळे होणे, नजर कमी होणे, वास ओळखण्याची क्षमता कमी होणे,
तोंडाला दुर्गंधी येणे, दात कमजोर होणे, चेहऱ्यावर सुरकुत्या पडणे, चेहरा निस्तेज
होणे, अशक्तपणा येणे, कमजोरी येणे, हाडे कमजोर होणे, उच्चरक्तदाब होणे, गैंगरिन,
लकवा, दमा, कॅन्सर, मधुमेह यासारख्या व्याधी जडण्याचे प्रमाणही वाढत आहे. यामुळे
लोकांमध्ये अकाली मृत्यूचे प्रमाण वाढलेले आहे.
तंबाखू सोडण्यासाठी काही उपाय
:
तंबाखू सेवनास भाग पाडणाऱ्या
लोकांपासून दूर राहणे, तंबाखू ऐवजी बडीसौंफ, लवंग, चणे, शेंगदाणे असे पदार्थ
चघळणे. आपले मन कामात गुंतवणे, आपण घेतलेल्या निर्णयावर ठाम राहणे.
राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम :
केंद्र
आणि राज्य सरकारच्या सहयोगाने राज्यात राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम
राबविण्यात येत असून व्यसन करणारे लोक व मुले व्यसनाला बळी पडून अकाली मृत्यू कमी
व्हावेत यासाठी व्यापक प्रमाणात प्रयत्न करण्यात येत आहेत. जनजागृतीमुळे या
व्यसनाचे गंभीर परिणामही जनतेपर्यंत पोहोचवले जात आहेत. या कायद्याअंतर्गत
सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान बंदी, 18 वर्षाखालील मुलांना तंबाखूजन्य पदार्थ विकणे
वा विकायला लावण्यास प्रतिबंध, तंबाखूचा प्रसार, जाहिरात व प्रायोजकत्व यावर बंदी,
शैक्षणिक संस्थेचा 100 यार्ड परिसरात तंबाखू विक्रीवर बंदी, तंबाखू उत्पादनावर धोक्याच्या
सुचना देणे याचा अंतर्भाव होतो. शासकीय कार्यालयात व परिसरात या पदार्थांच्या
सेवनावर कडक बंदी असून अशा लोकांच्या विरोधात दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार
कायद्याने अधिकाऱ्यांना दिले आहेत.
तंबाखू
सेवन ही शालेय मुलांमध्ये आज सर्वांत मोठी चिंतेची बाब असून लहान मुलांमधील
व्यसनाचे प्रमाण कमी करण्यासाठी पालकांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. पालकांनी
मुलांसमोर स्वत: व्यसन न करता व्यसनापासून परावृत्त होण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
कारण ज्येष्ठांचेच अनुकरण लहान मुले करतात व परिणामी वाढत्या वयात मुले व्यसनाधीन होतात.
त्यामुळे व्यसनापासून मुक्तता ही योग्य वयातच झाली पाहिजे. व्यसनापासून परावृत्त
होण्यासाठी व्यायाम, प्राणायाम, योगासने, आवडीचा छंद जोपासून त्यात रममाण होणे,
व्यसनी संगतीपासून लांब राहणे, वैद्यकीय मदत घेणे यासारखे उपाय करता येतील.
व्यसनमुक्तीकडे सुरु असलेल्या प्रक्रियेमध्ये समाजातील सर्व स्तरावरील घटकांचा
सहभाग अत्यंत महत्वाचा आहे.
व्यसनाधिनतेचे
परिणाम आपल्या आजूबाजूला व्यसनामध्ये अडकलेल्या लोकांना सांगुन त्यांना
व्यसनापासून रोखणे व त्यांना त्यापासून परावृत्त करणे ही आपल्या सर्वांची सामुहिक
जबाबदारी आहे. आपण सर्वजण मिळून जर या व्यसनाधीनतेच्या विरुद्ध एल्गार केला आणि
तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाला विरोध केला तर नक्कीच भारतीय नागरिकांचे
व भारताचे आरोग्य स्वस्थ आणि बलशाली होण्यास मदत होईल हीच अपेक्षा.
---
चंद्रकांत कारभारी
माहिती
सहायक
जिल्हा माहिती कार्यालय, हिंगोली
*****