15 May, 2023

 

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिराचे

18 मे रोजी आयोजन

 

हिंगोली (जिमाका), दि. 15 : समस्याग्रस्त पीडित महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे व त्यांच्या न्याय्य हक्कांचे संरक्षण होऊन त्यांना न्याय मिळण्यासाठी  महिलांना सुलभ  मार्गदर्शनाची  सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून महिला लोकशाही दिन राबविण्यात येतो.

महिला लोकशाही दिनाच्या धर्तीवर महिलांसाठी  शासनाच्या  विविध  विभागांमार्फत  राबविण्यात  येत असलेल्या योजनांची  माहिती  महिलांना  उपलब्ध  करुन  देण्याच्या अनुषंगाने तसेच त्यांच्या स्थानिक समस्यांचे निराकरण  करण्यासाठी  एक व्यासपीठ  उपलब्ध करुन  देण्यासाठी  दि. 18 मे, 2023 रोजी सकाळी 11.00 वाजता तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली  जिल्ह्यातील हिंगोली, कळमनुरी, सेनगांव येथे तहसील कार्यालयात तसेच वसमत, आँढा (नागनाथ) येथे पंचायत समिती कार्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी  होळकर "स्त्री शक्ती समाधान शिवीर’’ आयोजित करण्यात येणार आहे.

तालुक्यातील नगरपरिषद व नगरपंचायत, महसूल, कृषी, आदिवासी आर्थिक विकास महामंडळ, महिला आर्थिक विकास महामंडळ, अन्न व नागरी  पुरवठा (रेशन), शिक्षण, पोलीस (गृह), पाणी  पुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम (रस्ते), महावितरण (विद्युत विभाग), आरोग्य, विधीसेवा प्राधिकरण इत्यादी  सर्व विभागाच्या, महिलांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे निरसन  या शिबिरामध्ये  करण्यात येणार आहे. उपरोक्त विभागांशी संबंधित महिलांच्या तक्रारी असतील तर तालुक्यातील बालविकास प्रकल्प अधिकारी (ग्रामीण) यांचे कार्यालयास संपर्क साधून आयोजित करण्यात आलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी  होळकर स्त्री  शक्ती  समाधान शिबिरात विहित नमुन्यातील तक्रार अर्ज गूगल फॉर्म क्यू आर कोड  किंवा ऑफलाईन फॉर्म 2 प्रतीमध्ये सादर करावा, असे आवाहन राजाभाऊ मगर, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.

*****

No comments: