करवंदाच्या उत्पादनातून गंगाधर साधू यांनी साधली प्रगती
हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील
खंदारबन येथील शेतकरी गंगाधर साधू हे शेतीमध्ये
नवनवीन प्रयोग करत असतात. त्यामुळे श्री. साधू यांनी काळाची गरज
ओळखून त्यांच्या 5 ते 6 एकर शेतीवर मनरेगा अंतर्गत फळपीक लागवड या योजनेतून करवंदाची
लागवड केली आहे. याच करवंदाच्या फळापासून पानावर लावलेली गुलाबी चेरी तयार होते. या
पिकाला मार्केट दर पण चांगला आहे. या पिकाला फारसे पाणी लागत नाही. फारशी फवारणी व
खताचा सुध्दा खर्च नाही. याचे एकरी 5 ते 6 टन उत्पन्न मिळते. यापासून दोन ते अडीच लाखाचे
उत्पन्न श्री. साधू यांना मिळते. या करवंदाची लागवड एका रांगेत 4 फुटाच्या अंतरावर
व दोन ओळीतील अंतर 20 फूट याप्रमाणे 500 रोपाची लागवड केली आहे. या करवंदाच्या झाडाला
3 वर्षापासून फळे लागण्यास सुरुवात होते व उत्पन्न सुरु होते. 3 वर्षापासून ते पुढील
30 वर्षापर्यंत हमखास उत्पन्न मिळते. याची तोडणी ऑगस्ट-सप्टेंबर मध्ये होते. या करवंदासाठी
जळगाव, मुक्ताईनगर, गुजरात, दिल्ली येथील कंपन्या शेतातूनच माल खरेदी करुन घेऊन जातात.
तसेच त्यामध्ये आंतरपीक म्हणून सिताफळाची लागवड केली आहे. सध्या सिताफळाचे उत्पादन
सुरु होण्यास थोडा कालावधी लागणार असल्याचे सांगितले. याच बरोबर श्री. साधू यांनी करवंद
लागवडीपासून दोन वर्षापर्यंत मधल्या मोकळ्या जागेत सोयाबीन, गहू, हरभरा हे आंतरपीक
घेत होते. यापासून सुध्दा त्यांना चांगले उत्पन्न मिळत असल्याचे सांगितले. तसेच त्यांनी
हळूहळू करवंदाची रोपवाटिका तयार केली आहे. त्यांनी 20 ते 25 रुपये याप्रमाणे शेतकऱ्यांना
रोपे उपलब्ध करुन देतात. यातूनही त्यांना उत्पन्नाचा स्त्रोत सुरु आहे.
श्री. साधू यांनी त्यांच्या शेतात विहीर
घेतली आहे. तसेच त्यांनी शेती उत्पादनामध्ये शाश्वतता आणण्यासाठी तसेच दुष्काळावर
मात करण्यासाठी शेततळे उपयुक्त असल्याने राज्यातील पर्जन्यावर आधारित कोरडवाहू शेतीसाठी
पाणलोट व जलसंवर्धन माध्यमातून जलसिंचनाची उपलब्धता वाढविणे तसेच संरक्षित व शाश्वत
सिंचनाची सुविधा निर्माण करण्यासाठी “मागेल त्याला शेततळे” योजनेतून त्यांच्या शेतात शेततळे घेतले आहे.
शेती हा व्यवसाय अधिक फायदेशीर व्हावा,
शेतकऱ्यांची जोखीम कमी व्हावी तसेच आधुनिक कृषी तंत्राला प्रोत्साहन मिळण्यासाठी खात्रीपूर्वक
व संरक्षित सिंचन व्यवस्था निर्माण करणे आवश्यक आहे. केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी
योजनेमध्ये सन 2015-16 पासून ‘प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना’ समाविष्ट केली आहे. प्रत्येक
शेतकऱ्यांच्या शेतास पाण्याची उपलब्धता करणे आणि पाण्याची कार्यक्षमता वाढवून पाण्याच्या
प्रत्येक थेंबातून जास्तीत जास्त पीक उत्पादन मिळविणे (more crop per drop) हा या योजनेचा
उद्देश आहे.
कृषि विभागाच्या या योजनेतून दोन वर्षापूर्वी श्री.साधू यांनी ठिबक सिंचन संच व मोटार घेतली आहे. त्यांच्या शेतात
उपलब्ध असलेल्या विहीर व शेततळ्याच्या माध्यमातून ठिबक सिंचनाद्वारे ते पिकाला पाणी
देतात. त्यामुळे पिकाला आवश्यक तेवढेच पाणी मिळत असल्यामुळे पाण्याचीही बचत होत आहे.
श्री. साधू यांना कृषि विभागाचेही वेळोवेळी मार्गदर्शन मिळत असल्याचे ते सांगतात.
श्री. साधू यांच्याकडे मुक्त संचार गोठा
तयार केला आहे. याचबरोबर त्यांनी शिमला मिरचीचा शेड तयार केला आहे. ही सिमला मिरची
विक्रीसाठी जून महिन्यात उपलब्ध होणार आहे. यापासूनही त्यांना चांगले उत्पन्न मिळणार
आहे. तसेच त्यांनी पाच शेळ्या ठेवून शेळी पालनही
करतात. यापासूनही त्यांना वर्षाला 30 ते 40 हजार उत्पन्न मिळत आहे.
तसेच श्री. साधू यांनी आपल्या शेतात
गांडूळ खत व कंपोस्ट खत तयार करुन शेतातील पिकांना देतात. त्यामुळे त्यांचे उत्पन्नही
चांगले होते. एक प्रयोगशील शेतकरी म्हणून त्यांची परिसरात ओळख आहे.
श्री. साधू यांनी त्यांच्याकडे असलेल्या
चार गाई, एक वळू, एक म्हैस व एक बैल जोडी यांचे गोमुत्र जमा करुन ते पिकांना देतात,
असे वेगवेगळे प्रयोग श्री. साधू यांनी त्यांच्या शेतात केले आहेत. त्यामुळे एक प्रयोगशील शेतकरी म्हणून हिंगोली येथे दि.
25 ते 28 मार्च, 2023 या कालावधीत आयोजित जिल्हास्तरीय कृषि महोत्सवात पालकमंत्री अब्दुल
सत्तार यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले आहे . तसेच त्यांनी त्यांच्या शेतात तयार करण्यात आलेल्या करवंदासह इतर
रोपांची कृषि महोत्सवात स्टॉल उभारण्यात आले होते. या प्रदर्शनाच्या उद्घाटनाच्या वेळी
पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी भेट देऊन माहिती घेतली. या प्रदर्शनात श्री. साधू यांनी
नऊ ते दहा हजार रुपयाच्या रोपांची विक्री केली
आहे. शेतातील हे सर्व विविध उपक्रम सदाशिव चव्हाण यांच्या नियंत्रणाखाली राबविण्यात
येत असल्याचेही श्री. साधू यावेळी सांगायला विसरले नाहीत.
त्यांच्या प्रयोगशील शेतीसाठी जिल्हाधिकारी
जितेंद्र पापळकर, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शिवराज घोरपडे, उपविभागीय अधिकारी डॉ.
सचिन खल्लाळ, तालुका कृषि अधिकारी गोविंद कल्याणपाड, तोंडापूर येथील कृषि विज्ञान केंद्राची
टीम, परभणी विद्यापीठाची टीम तसेच मुंबईच्या स्पाईसेस बोर्डाच्या ममता रुपोलिया यांनी
भेट देऊन त्यांनी राबवित असलेल्या उपक्रमाची माहिती घेऊन त्यांचे कौतुक केले आहे.
शेतकऱ्यांना शेती व्यवसायामध्ये टिकायचे असेल तर त्यांनी नवनवीन प्रयोग केले पाहिजे. यातूनच आपली प्रगती साधली
पाहिजे असा संदेश श्री. साधू देतात.
---
चंद्रकांत कारभारी
माहिती सहायक
जिल्हा माहिती कार्यालय, हिंगोली
*****
No comments:
Post a Comment