जिल्हा बाल संरक्षण कक्षाकडून रस्त्यावर राहणाऱ्या मुलांचे
सर्वेक्षण
हिंगोली (जिमाका), दि.26 : जिल्ह्यात
जिल्हा महिला व बालविकास अधिकारी राजाभाऊ मगर यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा
बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांच्या नियोजनानुसार जिल्हा महिला व बालविकास
विभागांतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या वतीने रस्त्यावर राहणाऱ्या मुलांचे
सर्वेक्षण करण्यात येत आहे. दरवर्षी जिल्ह्यातील बालकांच्या संदर्भात नियमित विविध
उपक्रम राबविण्यात येतात. अशाच प्रकारचे जिल्हा बाल संरक्षण कक्षाकडून शहरी
भागामध्ये रस्त्यावर राहत असलेल्या मुलांचे सर्वेक्षण करण्यात आले. जी मुले कुटुंबापासून
दूर गेली आहेत आणि रस्त्यांवर राहत आहेत किंवा जी मुले रस्त्यांवर काम करतात आणि
कामानंतर कुटुंबात परत जातात त्यांना रस्त्यावरील मुले मानली जातात. हलाकीची
परिस्थिती असलेले कुटुंब उदारनिर्वाहासाठी तसेच काही जमातीमधील कुटुंब भिक्षा
मागण्याच्या उद्देशाने शहरी भागामध्ये येतात. त्या मुलांचा भिक्षा मागण्यासाठी व
बालकामगार म्हणून उपयोग केला जातो. अशी मुले शिक्षणापासून वंचित राहतात. ही मुले
गुन्हेगारीकडे वळू नये, त्यांना शिक्षण, आरोग्य तसेच इतर शासकीय योजना मिळाव्यात व
सामाजिक प्रवाहामध्ये आणण्यासाठी शासन स्तरावरुन विविध प्रयत्न केले जातात.
त्यांना रस्त्यावर आणणारा मार्ग हा त्यांच्या निवडीचा नव्हता अशा बालकांपर्यंत
पोहचण्यासाठी बाल संरक्षण कक्षामार्फत जिल्ह्यातील रस्त्यावर राहणाऱ्या बालकांचे
सर्वेक्षण करण्यात येत आहे.
या
सर्वेक्षणात आढळून आलेल्या बालकांना बाल बाल कल्याण समिती, हिंगोली समोर सादर
करण्यात येईल व बाल कल्याण समितीच्या आदेशान्वये आवश्यकतेनुसार बालकांना शासकीय
योजनेचा लाभ देण्यात येईल.
यासाठी जिल्हा
बाल संरक्षण कक्षातील जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे, बाल संरक्षण
अधिकारी (संस्थात्मक) गणेश मोरे, बाल संरक्षण अधिकारी (संस्थाबाह्य) जरीबखान पठाण,
कायदा तथा परिविक्षा अधिकारी अॅड. अनुराधा पंडित, समुपदेशक सचिन पठाडे, सामाजिक
कार्यकर्ता रामप्रसाद मुडे, रेशमा पठाण, माहिती विश्लेषक शेख रफीक शेख जिलानी,
डाटा एन्ट्री ऑपरेटर राहुल सिरसाट, क्षेत्रबाह्य कार्यकर्ता अनिरुध्द घनसावंत,
लेखापाल शितल भंडारे इत्यादी कर्मचाऱ्यांच्या टिमच्या माध्यमातून प्रत्येक
तालुक्यामध्ये हॉटस्पॉट ठरवून बालकांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे, अशी माहिती
जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, हिंगोली यांनी दिली आहे.
*****
No comments:
Post a Comment