31 May, 2023

 

शासन आपल्या दारी’’ कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी

लाभ धारकांची यादी निश्चित करावी

                                                        - जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर




हिंगोली (जिमाका), दि. 31 : जिल्ह्यातील  सर्व विभागाच्या प्रमुखांनी आपल्या विभागांतर्गत असलेल्या योजना अधिकाधिक सकारात्मक भावनेने पोहोचविण्यासाठी  कटिबध्द असले पाहीजे. या अभियानाच्या निमित्ताने  राज्याचे  मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांचा दि. 8 जून रोजीचा प्रस्तावित दौरा व इतर मान्यवरांची उपस्थिती  लक्षात  घेता  शासन आपल्या दारी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  सर्व  विभागप्रमुखांनी  लाभ धारकांची  यादी  निश्चित करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.  

शासन आपल्या दारी या अभियानानिमित्त आज येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हाधिकारी  जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली  बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रतिनिधी डॉ. नितीन राठोड, जिल्हा परिषदेचे प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी  नामदेव केंद्रे, निवासी उपजिल्हाधिकारी  दिलीप कच्छवे, जिल्हा नियोजन अधिकारी  सुधाकर जाधव, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शिवराज घोरपडे, विविध विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

सर्वसामान्यांची  कामे सुलभरित्या व स्थानिक पातळीवर होण्यासाठी  शासन प्रत्येक क्षेत्रात विकासाच्या अनेक योजना राबवत असते. गरजूंसाठी  तो आधार तर असतोच त्याचप्रमाणे, सामूहिक विकास  प्रक्रियेलाही  त्यातून  गती  मिळत असते. हेच लक्षात घेऊन नागरिकांना विविध योजनांचे लाभ  मिळावेत  यासाठी शासन आपल्या दारी हे अभियान  शासकीय  योजनांच्या  लाभधारकांचे  मनोबल, आत्मविश्वास आणि  शासकीय  योजनांप्रती  सकारात्मकता निर्माण करण्याच्या  दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. या अभियानाच्या  निमित्ताने  विविध  विभागाने  योजनानिहाय लाभार्थ्यांची माहिती तयार करुन ती तात्काळ जिल्हाधिकारी  कार्यालयास  उपलब्ध  करुन  द्यावी. तसेच शासनाच्या विविध  विभागांच्यावतीने  राबविल्या जाणाऱ्या  शासकीय  योजना  आणि  लाभार्थी यांचा समन्वय साधून हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नियोजन  करावेत, असे निर्देशही जिल्हाधिकारी  पापळकर यांनी बैठकीत दिले.   

यावेळी  मुख्यमंत्री  कार्यालयाचे  प्रतिनिधी  डॉ. नितीन राठोड यांनी हिंगोली येथील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  सर्व विभागांनी आपापल्या विभागाचे नोडल अधिकारी  नेमून  त्यांच्यावर लाभार्थ्यांची  सोय करण्याची  जबाबदारी सोपवावी. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी समन्वयाने कामे करावेत, अशा सूचना केल्या.

*****

No comments: