11 May, 2023

 

वसमत तालुक्यातील रांजना येथे ग्राम बाल संरक्षण समितीची बैठक संपन्न

 


            हिंगोली (जिमाका), दि. 11 :  जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी आर.आर.मगर यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांच्या नियोजनानुसार वसमत तालुक्यातील मौजे रांजना येथे नुकतीच ग्राम बाल संरक्षण समितीची बैठक घेण्यात आली.

या बैठकीत ग्राम बाल संरक्षण समितीची रचना व कार्यपध्दती विषयी तसेच ग्राम बाल संरक्षण समितीमध्ये नव्याने 20 ते 30 वयोगटातील युवक-युवतीची बाल मित्र म्हणून निवड करण्याबाबत जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे बाल संरक्षण अधिकारी (संस्थाबाह्य) जरीबखान पठाण यांनी माहिती दिली. तसेच बाल कायद्यांविषयी मार्गदर्शन करताना बाल विवाह प्रतिबंधक अधिनियम, 2006  विषयी सविस्तर माहिती सांगण्यात आली. ज्यामध्ये मुलीचे वय 18 व मुलाचे वय 21 असावे आणि जर मुलाचे व मुलीचे वय यापेक्षा कमी असेल तर असे विवाह बेकायदेशीर ठरले जातात. अशा गुन्ह्यास एक लाख रुपये दंड व 02 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा होऊ शकते.

बाल विवाहाची कारणे व दुष्परिणाम या विषयी बाल संरक्षण अधिकारी (संस्थात्मक) गणेश मोरे यांनी माहिती दिली. तसेच बाल विवाहास प्रतिबंध करण्यासाठी दि.21 ऑक्टोंबर,2022 रोजी दिलेल्या अधिसुचनेनुसार ग्राम सेवक तथा बाल विवाह प्रतिबंधक अधिकारी यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात बाल विवाह होऊ नयेत याबाबत खबरदारी घेण्यात यावी. शाळेतील प्रवेशित विद्यार्थी सतत 15 दिवस गैरहजर असेल तर संबंधित विद्यार्थ्यांची नोंद करुन ग्राम सेवक तथा बाल विवाह प्रतिबंधक अधिकारी यांच्याकडे संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी माहिती देण्याबाबत जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे सामाजिक कार्यकर्ता रामप्रसाद मुडे यांनी बैठकीत सांगितले.

            या बैठकीस ग्राम बाल संरक्षण समिती सदस्य, अंगणवाडी सेविका धम्मदीपा दिपके, गिता राऊत, उपसरपंच रामराव साळवे, तंटामुक्ती अध्यक्ष गंगाधर साळवे  व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

*****

No comments: