‘शासन आपल्या दारी ’कार्यक्रमाअंतर्गत
कृषि विभागाच्या विविध योजनांचा
लाभ घेण्याचे आवाहन
हिंगोली (जिमाका), दि. 19 : जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, हिंगोली यांच्या
मार्फत ‘शासन आपल्या दारी’या विशेष कार्यक्रमाअंतर्गत प्रधान मंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया योजना, महात्मा
गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना, एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान योजना यासह विविध योजनांचा लाभ जिल्ह्यातील
लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे.
प्रधानमंत्री
सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग उन्नयन योजना
‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत हिंगोली जिल्हयात केंद्र शासन
सहाय्यित प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग उन्नयन योजना सन 2020-21 ते
2024-25 या पाच वर्षाच्या कालावधीत एक जिल्हा एक उत्पादन या आधारावर असंघटीत क्षेत्रातील
अन्न प्रक्रिया उद्योगांसाठी राबविली जात आहे. या योजनेंतर्गत केंद्र आणि राज्य शासनाच्या
खर्चाचे प्रमाण 60: 40 असे आहे. वैयक्तीक/गट/कंपनी यांचा सुक्ष्म उद्योग प्रकलप किंमतीच्या
किमान 10 टक्के लाभार्थी हिस्सा, बँक कर्ज 90 टक्के सहभाग असून या प्रकल्पास कमाल
35 टक्के व 10 लाख रुपयाच्या मर्यादेत अनुदान अनुज्ञेय आहे.
केंद्र शासनाकडून आत्मनिर्भर
भारत पॅकेज अंतर्गत प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग ही योजना 2023-24 या
वर्षासाठी राबविण्यात येत आहे. ही योजना बँक कर्जाशी निगडीत असून जिल्ह्यातील सर्व
राष्ट्रीयकृत बँकांना सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग उभारणीसाठी कर्ज मंजुरी लक्षांक
देण्यात आलेला आहे. जिल्हा संसाधन व्यक्तीमार्फत प्रकल्प अहवाल तयार करणे, बँकांकडून
कर्ज मंजुरीसाठी मदत करणे, उद्योगासाठी लागणाऱ्या विविध परवानग्या मिळण्यासाठी मदत
केली जाणार आहे. वैयक्तीक मालकी, भागीदारी, शेतकरी उत्पादक संस्था, स्वंयसहायता गट,
गैर सरकारी संस्था, सहकारी संस्था, खाजगी कंपनी आदीसाठी किंमतीच्या 35 टक्के जास्तीत
जास्त 10 लाखापर्यंत बँक कर्जाच्या निगडीत अनुदान लाभ मिळणार आहे. यात लाभार्थी स्व:हिस्सा
गुंतवणूक 10 टक्के करावी लागणार आहे. त्यासाठी जास्तीत जास्त उद्योग उभारणी इच्छूक
लाभार्थ्यांनी या योजनेमध्ये https://pmfme.mofpi.gov.in/pmfme/#/Login
या संकेतस्थळाद्वारे सहभाग नोंदवावा. अधिक माहितीसाठी तालुका कृषि अधिकारी, मंडळ कृषि
अधिकारी व जिल्हा संसाधन व्यक्ती यांच्याशी संपर्क करावा.
महात्मा गांधी राष्ट्रीय
ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवड योजना
तसेच केंद्र पुरस्कृत
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवड योजना राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात फळबाग लागवडीच्या
माध्यमातून लागवडीखालील क्षेत्रात वाढ करणे, शाश्वत रोजगार निर्मिती करुन स्थानिक पातळीवर
पूरक व्यवसायात वाढ करणे व उत्पादन वाढविणे योजनेचा उद्देश आहे. ही योजना जिल्ह्यातील
सर्व ग्राम पंचायतीमध्ये राबविण्यात येत असून लागवड जून ते मार्च या कालावधीत करण्यात
येइल. लाभार्थीस शंभर टक्के अनुदानावर सलग शेतावर, शेताच्या बांधावर व पडीक जमिनीवर
विविध फळझाडांची, वृक्षांची, फूलपिकांची, मसाला पिकांची लागवड करता येते. फळपिके, वृक्षा
व इतर पिकामध्ये आंबा, काजू, चिकू, पेरु, डाळींब, संत्रा, मोसंबी, कागदी लिंबू, नारळ,
बोर, सिताफळ, आवळा, चिंच, कवठ, जांभूळ, अंजीर कलमे, साग, गिरीपुष्प, सिंधी, शेवगा,
हादगा, बांबू, जट्रोफा, कडीपत्ता, पानपिंपरी, करंज व इतर औषधी वनस्पतींचा समावेश आहे.
नवीन फळपिकामध्ये द्राक्ष, ड्रॅगनफ्रूट, ॲव्होकॅडो, केली (3 वर्ष) या पिकाचा समावेश
आहे. फूल पिकामध्ये गुलाब, मोगरा, निशीगंध, सोनचाफा या पिकाचा समावेश आहे. मसाला पिकामध्ये
लवंग, दालचिनी, जायफह, मिरी या पिकाचा समावेश आहे.
यासाठी लाभधारकाच्या नावे
जमीन असणे आवश्यक आहे. तसेच लाभार्थी जॉबकार्ड धारक व अल्प, अत्यल्प भूधारक असावा.
जमीन कुळ कायद्याखाली येत असल्यास व सातबाराच्या उताऱ्यावर जर कुळाचे नाव असले तर योजना
कुळाच्या संमतीने राबविण्यात यावी. योजनेतील लाभार्थ्यांनी लागवड केलेल्या फळझाडे,
वृक्षांच्या दुसऱ्या वर्षी किमान 90 टक्के व तिसऱ्या वर्षी 75 टक्के फळझाडे, वृक्ष
जिवंत राहिले पाहिजे. लाभार्थ्यांना 0.20 हेक्टर ते 2.00 हेक्टर क्षेत्राचे मर्यादेत
फळझाड लागवड करता येते. इच्छूक शेतकऱ्यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार
हमी योजनेंतर्गत फळबाग लागवडीचा लाभ घेण्यासाठी https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScF-OuLLq0zrDvIHLjzE_W5RFIR98G3ypbfZrSL5veTUZtFug/viewform
या लिंकवर नाव नोंदवावे अथवा अधिक माहितीसाठी संबंधित गावचे कृषि सहायक, कृषि पर्यवेक्षक,
मंडळ कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.
एकात्मिक फलोत्पादन
विकास व राष्ट्रीय कृषि विकास योजना
तसेच एकात्मिक फलोत्पादन
विकास अभियानाचा कार्यक्रम महाडीबीटी पोर्टलमार्फत राबविण्यात येत आहे. हिंगोली जिल्ह्यासाठी
वार्षिक कृति आराखडा सन 2023-24 मंजुरीसाठी सादर केलेला आहे. त्यामध्ये क्षेत्र विस्तार
मध्ये ड्रॅगन फ्रुट, केळी, सुट्टी फुले, हळद लागवड व मशरुम उत्पादन प्रकल्प, फुल शेती,
मसाला लागवड, जुन्या फळबागाचे पुनरुज्जीवन, सामुहिक शेततळे, शेततळे अस्तरीकरण, संरक्षित
शेती शेडनेट हाऊस, पॉली हाऊस, प्लास्टीक मल्चिंग, मधुमक्षिका पालन, पॅक हाऊस, कांदाचाळ,
फिरते विक्री केंद्र (हातगाड्या) इत्यादीचा समावेश आहे. महाडीबीटी पोर्टलच्या https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/Login/Login
या संकेतस्थळावर शेतकऱ्यांनी स्वत:च्या मोबाईल, संगणक, लॅपटॉप, टॅबलेट, सामुदायिक सेवा
केंद्राच्या माध्यमातून महाडीबीटी पोर्टलवर शेतकरी योजना या सदराखाली नोंदणी करावी.
‘शासन आपल्या दारी’ या
उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी कृषि विभागाच्या विविध योजनांचा
लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शिवराज घोरपडे यांनी केले आहे.
****
No comments:
Post a Comment