23 May, 2023

 

हवामान बदल व त्यावर मात करण्यासाठीचे तंत्रज्ञान या विषयावर कार्यशाळा संपन्न

 



हिंगोली (जिमाका), दि. 23 : जागतिक जैवविविधता दिवस पर्यावरण पूरक जीवन पद्धती अभियाना अंतर्गत प्रकल्प संचालक आत्मा हिंगोली व कृषी विज्ञान केंद्र तोंडापूर यांच्या वतीने  हवामान बदल व त्यावर मात करण्यासाठीचे तंत्रज्ञान या विषयावर जिल्हास्तरीय कार्यशाळा हिंगोली येथील आत्मा कार्यालयात आयोजित करण्यात आली होती.

या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी  आत्माचे प्रकल्प संचालक युवराज शहारे  हे होते. यावेळी तोंडापूर कृषि विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्र तथा प्रमुख डॉ.पी. पी. शेळके, स्मार्टचे नोडल अधिकारी जी. बी. बंटेवाड, हिंगोलीचे तालुका कृषी अधिकारी कमलाकर सांगळे ,  कृषी अधिकारी  क्षीरसागर, कृषि विज्ञान केंद्राच्या पीकशास्त्र विभागाचे प्रा. राजेश भालेराव, कीटकशास्त्र विभागाचे प्रा. अजयकुमार सुगावे, कृषी विज्ञान केंद्र तोंडापूर व परिसरातील शेतकरी आणि कृषी अधिकारी उपस्थित होते.

कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ.पी. पी. शेळके यांनी जागतिक जैवविविधता दिवस पर्यावरण पूरक जीवन पद्धती अभियानाअंतर्गत दि. 22 मे ते 28 मे, 2023 या दरम्यान कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून या अभियानांतर्गत सात दिवस चालणाऱ्या कार्यक्रमाबद्दल त्यांनी माहिती दिली. त्याचबरोबर बदलत्या हवामानामध्ये वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा त्या त्यावेळी योग्य पद्धतीने वापर कसा करावा याविषयी माहिती दिली.

पीक शास्त्र विभागाचे  प्रा. राजेश भालेराव यांनी येणाऱ्या खरीप हंगामामध्ये सोयाबीन, तूर त्याच पद्धतीने मूग, उडीद या पिकामध्ये  वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या नवीन नवीन वाणांचा उपयोग शेतकऱ्यांनी  त्यांच्या शेती  व्यवसायामध्ये  केला पाहिजे. तसेच एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन याचा अंतर्भाव करुन योग्य पध्दतीने, योग्य वेळी बीज प्रक्रिया व शिफारशीनुसार अंतर ठेवून पिकाची पेरणी करावी, असे सांगितले.

कीटकशास्त्र विभागाचे प्रा.अजयकुमार सुगावे यांनी  शंकी  गोगलगाय, पैसा ( मिल्ली पिड्स), हुमणी तसेच सोयाबीनमध्ये चक्रीभुंगा, खोडमाशी व तूर या पिकांमध्ये मर रोगाचे व्यवस्थापन कसे करावे व यामध्ये सामुदायिक पद्धतीने शेतकऱ्यांनी  हवामान  बदलाच्या आधारावर पीक संरक्षणाच्या बाबतीत येणाऱ्या समस्यांवर एकत्रित उपाययोजना कराव्यात. सुरुवातीच्या टप्प्यांमध्ये  बीजप्रक्रिया करुन एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा अवलंब करणे काळाची गरज आहे, असे सांगून पिकाची फेरपालट करणे पीक संरक्षणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची बाब आहे, असल्याचे सांगितले.  

स्मार्टचे नोडल अधिकारी जी. बी. बंटेवाड यांनी जैवविविधता दिवसानिमित्त शेतकऱ्यांसाठी असलेल्या विविध योजना मार्फत हवामान बदल व त्यावर उपाययोजना करण्यासाठी तंत्रज्ञानाचा अवलंब कसा करावा, याची माहिती दिली.

तालुका कृषी अधिकारी  कमलाकर सांगळे  यांनी  एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन व एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन याचा अंतर्भाव करावा.  खरीप  पिकामध्ये आंतर पिकाचा अंतर्भाव करुन व कमीत कमी रासायनिक घटकांचा वापर करुन  निसर्गातील जैवविविधता जोपासण्यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन या अभियानात सहभागी व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली.

प्रास्ताविकात आत्माचे प्रकल्प संचालक युवराज शहारे यांनी  शेतकऱ्यांनी शेती व्यवसायामध्ये होणारे बदल व त्यावरील उपाययोजना या संदर्भामध्ये सखोल असं तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावं असे सांगितले. या कार्यशाळेचे सूत्रसंचालन कृषी अधिकारी  क्षीरसागर यांनी केले.

*****

No comments: