11 May, 2023

 प्रशासनाच्या सतर्कतेमुळे वेळेवर दोन बालविवाह थांबविण्यात यश

 

            हिंगोली (जिमाका), दि. 11 :  महिला व बाल विकास विभागाच्या जिल्हा बाल संरक्षण कक्षामार्फत बाल कायद्यांची जनजागृती करण्यात येत आहे. मात्र तरीही अनेक ठिकाणी बाल विवाहाचे प्रकार घडत आहेत. याच दरम्यान औंढा नागनाथ तालुक्यातील मौजे अंजनवाडा येथील युवक परभणी जिल्ह्यातील अल्पवयीन मुलीसोबत बाल विवाह करणार असल्याची तसेच मौजे बोथी ता.कळमनुरी येथील अल्पवयीन मुलीचे मौजे सुकापुर ता.औंढा नागनाथ येथे बालविवाह होणार असल्याची गोपनीय माहिती प्रशासनास मिळताच या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी आर.आर.मगर यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांच्या नियोजनानुसार तसेच औंढा पोलीस स्टेशन येथील पोलीस निरीक्षक विश्वनाथ झुंजारे व आखाडा बाळापूर पोलीस स्टेशन येथील सहायक पोलीस निरीक्षक पंढरीनाथ बोधनापोड यांच्या सहकार्याने सहा.पोलीस निरीक्षक दिक्षा लोकडे, पो.हे.कॉ. एन.एस.बडे, ज्ञानेश्वर गोरे, के.डी. वाघमारे, जिल्हा बाल संरक्षण कक्षातील कायदा तथा परिविक्षा अधिकारी ॲड.अनुराधा पंडित, समुपदेशक सचिन पठाडे यांनी मौजे अंजनवाडा ता.औंढा नागनाथ येथे भेट दिली असता वरील दोन्ही ठिकाणी लग्नाचा मांडव तसेच आचारी स्वयंपाक करतांना दिसून आले. संबंधित बाल वधुंचे आई-वडील व वराकडील सर्व नातेवाईक वऱ्हाडी मडळी यांना बालविवाह प्रतिबंधक अधिनियम, 2006 विषयी माहिती सांगण्यात आली. ज्यामध्ये मुलीचे वय 18 व मुलाचे वय 21 असावे आणि जर मुलाचे व मुलीचे वय यापेक्षा कमी असेल तर असे विवाह बेकायदेशीर ठरले जातात. अशा गुन्ह्यास एक लाख रुपय दंड व 02 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा होऊ शकते. तसेच बाल विवाहाची कारणे व दुष्परिणाम याविषयी सविस्तर मार्गदर्शन करुन बालविवाह प्रतिबंधक प्रतिज्ञेची शपथ घेण्यात आली. नियोजित दोन्ही बाल विवाह थांबविण्यात प्रशासनाला यश आले. दोन्ही बालिकांच्या आई-वडीलाकडून मुलीचे वय 18 वर्ष पुर्ण होईपर्यंत लग्न करणार नाही असा लेखी जबाब लिहुन घेण्यात आला.

            हे बालविवाह थांबविण्यासाठी बोथी ता.कळमनुरी येथील ग्रामसेवक तथा बाल विवाह प्रतिबंधक अधिकारी, सरपंच तसेच जिल्हा बाल संरक्षण कक्षातील बाल संरक्षण अधिकारी (संस्थात्मक) गणेश मोरे, बाल संरक्षण अधिकारी (संस्थाबाह्य) जरीबखान पठाण, सामाजिक कार्यकर्ता रेशमा पठाण यांनी सहकार्य केले. तसेच अंजनवाडा येथील ग्रामसेवक तथा बाल विवाह प्रतिबंधक अधिकारी भाऊसाहेब भुजबळ, मंडळाधिकारी रंगनाथ म्हेत्रे, सरपंच किरण घोंगडे, पोलीस पाटील विनायक काचगुंडे, अंगणवाडी सेविका शेशीकला राठोड, मदतनीस उज्वला पुंडगे तसेच गावातील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.

वरील दोन्ही बालिकेला पुढील कार्यवाहीसाठी मा.बाल कल्याण समिती, हिंगोली समोर हजर करण्यात आले. त्यानंतर बालीकेचे वयाची 18 वर्ष पूर्ण होईपर्यंत मा.बाल कल्याण समिती हिंगोली कडून दर महिन्याला बालिकेबाबत पाठपुरावा करण्यासंदर्भात सूचना महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयास देण्यात येतात व त्यानुसार बालिकेच्या कुटुंबाची पार्श्वभूमी आणि सामाजिक स्थिती/सद्यस्थिती बाबत वेळोवेळी माहिती मा.बाल कल्याण समितीला कळविण्यात येते. आणि बालीकेच्या वयाच्या 18 वर्षापर्यंत नियमित पाठपुरावा घेतला जातो, अशी माहिती जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, हिंगोली यांनी दिली आहे.

*****

No comments: