01 May, 2023

 

‘जिल्हा वार्षिक योजनेच्या 2022-23 या आर्थिक वर्षातील270 कोटी 19 लाख रुपयाच्या खर्चास मान्यता’

कुरुंदा येथील नदीचे खोलीकरण व रुंदीकरणाचे काम त्वरित सुरु करावेत

                                                                                                                 - पालकमंत्री अब्दुल सत्तार

 

  • कुरुंदा पूर नियंत्रणासाठी 14 कोटी रुपयाच्या प्रस्तावास तात्काळ मंजुरी घेण्याची कार्यवाही करण्यात येईल
  • वेळेत निधी खर्च केल्याने पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी जिल्हाधिकारी व संबंधित यंत्रणेचे केले अभिनंदन

 


हिंगोली (जिमाका), दि. 01 :  जिल्ह्याचे पालकमंत्री तथा कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या जिल्हा नियोजन समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत सन 2022-23 मध्ये जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना, आदिवासी योजनेत एकूण 270 कोटी 21 लाख 71 हजार रुपयाचा निधी प्राप्त झाला होता. यापैकी जिल्ह्यात विकास कामावर झालेल्या 270 कोटी 19 लाख 13 हजार रुपयाच्या खर्चाला मान्यता देण्यात आली. वेळेत निधी खर्च केल्याने पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर तसेच जिल्ह्यातील सर्व यंत्रणांचे अभिनंदन केले.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात राज्याचे कृषी मंत्री तथा हिंगोलीचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी आमदार सर्वश्री तान्हाजी मुटकूळे, राजू नवघरे, संतोष बांगर, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी पालकमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले की, जिल्ह्यातील सर्व शासकीय यंत्रणांनी सर्वसामान्य जतनेचा विचार करुनच विविध विकास कामे करावीत. तसेच यावेळी त्यांनी दिव्यांग निधी वेळेवर खर्च करण्याबरोबरच जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, निजाम कालीन शालेय इमारतींची दुरुस्ती,, जिल्ह्यातील तिर्थक्षेत्र विकासांची कामे, मनरेगाची कामे, संरक्षण भिंत विषयक प्रलंबित कामे, महावितरण विषयक नवीन डी.पी. बसविणे, 33 केव्ही उपकेंद्र विषयक प्रलंबित कामे जलदगतीने पुर्ण करण्याच्या संबंधित विविध यंत्रणांना सुचना दिल्या. या कामात दिरंगाई केल्यास संबंधितावर कारवाई करावी, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. यावेळी लोकप्रतिनिधी उपस्थित केलेल्या सर्व कामे तात्काळ पूर्ण करावीत, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

वसमत तालुक्यातील मौजे कुरुंदा गावातील गेल्या पावसाळ्यात उद्भवलेल्या पुरपरीस्थितीमुळे गावात पाणी शिरुन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. याबाबतचा आढावा घेतांना  पालकमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले, कुरुंदा येथे पूरपरिस्थिती उद्भवू नये यासाठी शासनाकडे असलेल्या विविध यंत्रांचा वापर करुन गावाभोवती असणाऱ्या नदीचे खोलीकरण व रुंदीकरण करण्याची कार्यवाही त्वरीत सुरु करावी. यासाठी जिल्हाधिकारी यांनी मौजे कुरुंदा येथे प्रत्यक्ष भेट देवून पाहणी करुन, नदीकाठावरील गावकरी व शेतकरी यांनी केलेले अतिक्रमण त्वरित काढण्याची कारवाई करुन पुरपरिस्थीबाबत योग्य त्या उपाय योजना कराव्यात. कायमस्वरुपी पूर नियंत्रणासाठी दहा दिवसाच्या आत मा. मुख्यमंत्री व मा. उपमुख्यमंत्री यांची भेट घेवून शासनाकडे पाठविलेल्या 14 कोटी रुपयांच्या खर्चाच्या प्रस्तावास मंजूरी देण्याची कार्यवाही तात्काळ करण्याचे आश्वासन दिले.

यावेळी खासदार हेमंत पाटील यांनी हिंगोली जिल्ह्यात होत असलेल्या लिगो प्रकल्पास मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी 2600 कोटी रुपयांची तरतूद मंजूर केल्याने तसेच हिंगोली जिल्हा हळद पिकांच्या उत्पादनात जगात सर्वप्रथम असून मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन केंद्र स्थापन करण्यास 100 कोटी रुपयाच्या तरतुदीस मान्यता दिल्याबद्दल मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अभिनंदनाचा ठराव मांडला. यास आमदार तानाजी मुटकुळे यांनी अनुमोदन दिले.

आमदार श्री. मुटकुळे यांनी जिल्ह्यातील फाळेगाव येथील तिर्थक्षेत्रास निधी उपलब्ध करुन देण्याची तसेच जिल्ह्यातील पूरपरिस्थितीपासून बचावासाठी कायमस्वरुपी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी आमदार श्री. नवघरे यांनीही जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रास निधी उपलब्ध करुन देण्याबाबत तसेच मौजे कुरुंदा गावाच्या पूर परिस्थितीवर कायमस्वरुपी उपाययोजना करण्यासाठी संबंधित शासकीय यंत्रणांना सूचित केले. आमदार श्री. बांगर यांनी महावितरण विभागाच्या विविध प्रलंबित कामे तात्काळ पूर्ण करण्याच्या सुचना दिल्या. यावेळी बैठकीस सर्व विभागाच्या विभाग प्रमुखांची उपस्थिती होती.

****

 

No comments: