14 June, 2023

 

दोन गट क्रमांकामध्ये परस्पर ताबा असलेल्या शेतकऱ्यांनी सलोखा योजनेचा लाभ घ्यावा

           - अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी

 

* हिंगोली उपविभागीय कार्यालयात आयोजित बैठकीत अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी घेतला विविध विषयाचा आढावा

* सलोखा योजनेंतर्गत संपूर्ण मुद्रांक शुल्काऐवजी केवळ 1100 रुपये व नोंदणी शुल्क भरुन आदलाबदली लेखाच्या प्रतीचे लाभार्थ्यांना वितरण

 



            हिंगोली (जिमाका), दि. 14 : येथील उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात आज अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली सलोखा योजना, बळीराजा सामाजिक आर्थिक सर्व्हेक्षण, डी-4 (संगणकीय सातबारा दुरुस्ती), गाव नकाशाप्रमाणे पांदण रस्ते मोकळे करणे या विषयाचा आढावा घेण्यात आला. यावेळी प्र. उपविभागीय अधिकारी नवनाथ वगवाड, सेनगावचे तहसीलदार सखाराम मांडवगडे, परि. तहसीलदार हिमालय घोरपडे, हिंगोली व सेनगावचे तालुका कृषि अधिकारी, गटविकास अधिकारी, नायब तहसीलदार पी. एन. ऋषी, उपविभागातील सर्व मंडळ अधिकारी उपस्थित होते.

            यावेळी आढावा घेताना सर्वप्रथम सलोखा योजनेचा लाभ घेतलेले मौजे लोहगाव ता.जि.हिंगोली येथील लाभार्थी शेतकरी  रामराव विश्वनाथ सावळे यांच्या नावे असलेली जमीन जिचा प्रत्यक्ष ताबा श्रीमती गोकर्णा बाबूराव सावळे यांचा होता. परस्पर दोन गटातील आदलाबदली करण्यासाठी नियमानुसार अंदाजे 60 हजार रुपये शुल्क भरावे लागले असते. परंतु या योजनेतून त्यांना संपूर्ण मुद्रांक शुल्काच्या ऐवजी केवळ 1100 रुपये व नोंदणी शुल्क भरुन आदलाबदली लेख सलोखा योजनेअंतर्गत करुन त्यांची प्रत अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांच्या हस्ते संबंधित शेतकऱ्यांना देण्यात आली. तसेच लोहगाव येथील श्यामराव तुकाराम सावळे व रामचंद्र पुंजाजी सावळे यांनाही सलोखा योजनेंतर्गत दस्ताची प्रत देण्यात आली. याकामी संबंधित तलाठी गजानन रणखांब, मंडळ अधिकारी आर. डी. दराडे यांनी गावात जाऊन या योजनेची प्रसिध्दी करुन लोकांना जागृत केले व त्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रेरित केल्यामुळे संबंधित तलाठी व मंडळ अधिकारी यांची प्रशंसा करुन त्यांचे अभिनंदन केले.

गेल्या 12 वर्षापासून दोन गट क्रमांकामध्ये परस्पर ताबा असलेल्या शेतकऱ्यांनी सलोखा योजनेंतर्गत संबंधित गावाचे तलाठी व मंडळ अधिकारी यांच्याकडून विहित नमुन्यात पंचनामा करुन मोठ्या प्रमाणात लाभ घेण्याचे आवाहन अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी केले.

            तसेच बळीराजा आर्थिक व सामाजिक सर्व्हेक्षणाबाबत तालुकानिहाय संबंधित तहसीलदार, तालुका कृषि अधिकारी, गटविकास अधिकारी, मंडळ अधिकारी यांचा आढावा घेऊन दि. 9 जून, 2023 रोजीच्या बैठकीमध्ये दिलेल्या सूचनाप्रमाणे उल्लेखनीय काम केल्यामुळे संबंधितांची प्रशंसा करुन उर्वरित कामे दोन दिवसात शंभर टक्के पूर्ण करावेत, असे निर्देश दिले. डी-4 (संगणकीय सातबारा दुरुस्ती) च्या कामाचा आढावा घेताना एक गट अहवाल असलेली गावे प्राधान्याने डी-4 करुन येत्या काळात युध्दपातळीवर कामे पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. तसेच गाव नकाशाप्रमाणे सर्व पांदण रस्ते मोकळे करण्याचे निर्देश दिले.

*****

No comments: