मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषित
हिंगोली
(जिमाका), दि. 21 : भारत निवडणूक आयोगाने 01 जानेवारी, 2024 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह
मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषित केला असून मा. मुख्य निवडणूक
अधिकारी, महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी दि. 15 जून, 2023 च्या पत्रान्वये हा कार्यक्रम
सर्व उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी (ERO)/ सर्व तहसीलदार तथा सहाय्यक
मतदार नोंदणी अधिकारी (AERO) यांच्या स्तरावरुन राबविण्याच्या सूचना/ निर्देश प्राप्त
झाले आहेत. छायाचित्रासह मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाचे टप्पे
पुढिलप्रमाणे आहेत.
पुनरिक्षण पूर्व उपक्रम : या अंतर्गत मतदार
नोंदणी अधिकारी, सहायक मतदार नोंदणी अधिकारी, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचे मतदार
यादी व निवडणूक कायदेविषयक मार्गदर्शन आणि आयटी अप्लीकेशन याबाबत प्रशिक्षण आयोजित
करण्याचे काम गुरुवार दि. 1 जून, 2023 ते दि. 20 जुलै, 2023 या कालावधीत करण्यात येणार
आहे. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) घरोघरी भेटी देऊन पडताळणी करण्याचे काम शुक्रवार,
दि. 21 जुलै, 2023 ते सोमवार, दि. 21 ऑगस्ट, 2023 या कालावधीत करण्यात येणार आहे.
मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण व प्रमाणिकरण
आणि पुनर्रचना, मतदार यादी, ईपीक (EPICs) मधील तफावत दूर करणे, अस्पष्ट, निकृष्ट दर्जाचे
छायाचित्र बदलून चांगल्या प्रतीची छायाचित्रे सुनिश्चित करुन प्रतिमेच्या गुणवत्तेत
सुधारणा करणे, आवश्यक असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण आणि गैर-मानवी प्रतिमा बदलणे, विभाग/भागाची
पुनर्रचना करणे आणि मतदान केंद्राच्या विभाग/भाग सीमांच्या प्रस्तावित पुनर्रचनेचे
अंतिम रुप देणे आणि मतदान केंद्राची यादी तयार करुन मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करणे,
मतदार यादीतील तफावत ओळखणे आणि अशी तफावत भरुन काढण्यासाठी रणनिती आणि टाईमलाईन अंतिम
करणे आणि कंट्रोल केबल अद्यावतीकरण करण्याचे काम मंगळवार दि. 22 ऑगस्ट, 2023 ते शुक्रवार,
दि. 29 सप्टेंबर, 2023 या कालावधीत करण्यात येणार आहे.
प्रपत्र 1 ते 8 तयार करणे, दि. 01 जानेवारी,
2024 अर्हता दिनांकावर आधारित पुरवणी व प्रारुप मतदार यादी तयार करण्याचे काम शनिवार,
दि. 30 सप्टेंबर, 2023 ते सोमवार, दि. 16 ऑक्टोबर, 2023 या कालावधी करण्यात येणार आहे.
पुनरिक्षण उपक्रम : या अंतर्गत एकत्रिकृत
प्रारुप मतदार यादी प्रसिध्दीचे काम मंगळवार,
दि. 17 ऑक्टोबर, 2023 रोजी करण्यात येणार आहे. दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी
मंगळवार, दि. 17 ऑक्टोबर, 2023 ते गुरुवार, दि. 30 नोव्हेंबर, 2023 असा आहे. मतदार
नोंदणीच्या विशेष मोहिमांचा कालावधी हा दोन शनिवार व रविवार दावे व हरकती स्वीकारण्याच्या
कालावधीत मा. मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांनी निश्चित केलेल्या दिवशी राहील.
दावे व हरकती निकाली काढण्याचा कालावधी मंगळवार, दि. 26 डिसेंबर, 2023 पर्यंत राहील.
मतदार यादी मापदंडाप्रमाणे तपासणी करणे आणि अंतिम मतदार यादी प्रसिध्दीसाठी मा. भारत
निवडणूक आयोगाची मान्यता प्राप्त करुन घेणे, डेटाबेस अद्यावत करणे आणि परिशिष्टाची
छपाई करण्याचे काम सोमवार, दि. 1 जानेवारी, 2024 रोजी करण्यात येणार आहे. शुक्रवार,
दि. 05 जानेवारी, 2024 रोजी अंतिम मतदार याद्यांची प्रसिध्दी करण्यात येणार आहे.
वरील तपशीलानुसार सर्व विधानसभा मतदारसंघांच्या
मतदार याद्यांचा 01 जानेवारी, 2024 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार
यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषित केला आहे. त्यानुसार सर्व उपविभागीय
अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी (ERO)/ सर्व तहसीलदार तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी
(AERO) यांच्या स्तरावरुन दि. 21 जुलै, 2023 ते दि. 21 ऑगस्ट, 2023 दरम्यान मतदान केंद्रस्तरीय
अधिकारी यांच्याद्वारे घरोघरी भेट देवून तपासणी, पडताळणी करणे. तसेच दिनांक 22 ऑगस्ट,
2023 ते 29 सप्टेंबर, 2023 या दरम्यान मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण व प्रमाणिकरण करण्यात
येणार आहे.
दि.
17 ऑक्टोंबर, 2023 रोजी एकत्रिकृत प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार असून
दि. 17 ऑक्टोंबर, 2023 ते 30 नोंव्हेबर, 2023 या कालावधीत मतदार यादीत नवीन नाव
नोंदणीसाठी नमुना नं. 6, मतदार यादीतील नोंदी दुरुस्तीसाठी नमुना नं. 8 आणि त्याच विधानसभा मतदारसंघात नाव स्थलांतरीत करण्याचे
दावे आणि मतदार यादीतून नाव वगळण्यासाठी नमुना नं. 7 मधील दावे व हरकती सर्व संबधित
मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO), उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी (ERO)
तसेच तहसीलदार तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी (AERO) यांच्या कार्यालयातील मतदार
मदत कक्षा (VHC) मार्फत स्वीकारण्यात येतील.
दि.
17 ऑक्टोंबर, 2023 रोजी प्रसिध्द होणाऱ्या प्रारुप मतदार याद्यांमध्ये ज्या पात्र मतदारांची
नावे समाविष्ट नसतील, असे मतदार तसेच दि. 01 एप्रिल, 01 जुलै, 01 ऑक्टोंबर आणि 01 जानेवारी अर्हता दिनांकावर ज्यांचे वय 18 वर्ष पूर्ण
होत आहे, अशा सर्व पात्र नागरिकांना नाव नोंदणीसाठी विहित नमुना नं. 6 मधील अर्ज सादर
करता येईल. मतदार याद्यांतील नाव वगळणी बाबत आक्षेप असतील तर प्रती व्यक्ती पाच या
मर्यादेत नमुना नं. 7 मध्ये हरकती नोंदविता येतील. तसेच मतदार यादीतील नोंदीत दुरुस्त्या,
सुधारणा करावयाच्या असल्यास नमुना नं. 8 मधील दावे, आणि त्याच विधानसभा मतदारसंघात
नाव स्थलांतरीत करणे मधील दावे नोंदविता येतील. सर्व दावे व हरकती दि. 17 ऑक्टोंबर,
2023 ते दि. 30 नोव्हेंबर, 2023 या कालावधीत सर्व संबधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी
(BLO), उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी (ERO) तसेच तहसीलदार तथा सहाय्यक
मतदार नोंदणी अधिकारी (AERO) यांच्या कार्यालयातील मतदार मदत कक्षा (VHC) मार्फत स्वीकारण्यात
येतील.
छायाचित्रासह
मतदार याद्यांच्या पुनरिक्षण कार्यक्रमादरम्यान प्रत्यक्ष मतदान केंद्रांच्या ठिकाणी
दोन विशेष मोहिमांचे (स्पेशल कॅम्पेन) आयोजन करण्याच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत.
मा. मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांनी निश्चित केलेल्या विशेष मोहिमांच्या दिवशी
प्रत्येक मतदान केंद्रावर बीएलओ स्वतः हजर राहून अर्ज व छायाचित्र स्वीकारण्याची कार्यवाही
करणार आहेत.
या
छायाचित्रासह मतदार याद्यांच्या पुनरिक्षण कार्यक्रमासाठी मा. भारत निवडणूक आयोगाची
मान्यता प्राप्त असलेल्या राजकीय पक्षांनी प्रत्येक मतदान केंद्रासाठी एक या प्रमाणे
मतदान केंद्रस्तरीय अभिकर्त्याची (BLA) नेमणूका करुन त्यांची विहित नमुन्यातील यादी
संबधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO), उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी
(ERO) तसेच तहसीलदार तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी (AERO) यांना उपलब्ध करुन द्यावी.
मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्या मदतीने मतदार याद्या अधिक अचूक व परिपूर्ण
करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र
पापळकर यांच्या वतीने उपजिलहा निवडणूक अधिकारी दिलीप कच्छवे यांनी केले आहे.
*****
No comments:
Post a Comment