“महाज्योतीच्या पोलीस भरती प्रशिक्षण योजनेतील
उमेदवारांचे सुयश !”
18 प्रशिक्षणार्थ्यांची महाराष्ट्र पोलीस दलात निवड !
हिंगोली (जिमाका), दि. 05
: महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण
संस्था महाज्योती, नागपूर व संबोधी अकादमी महाराष्ट्र संचलित संबोधी स्पर्धा
परीक्षा प्रशिक्षण केंद्र छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद या संस्थेमार्फत इतर मागास
वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील उमेदवारांना
महाराष्ट्रातील तसेच केंद्रातील पोलीस सेवेत संधी मिळण्यासाठी पोलीस भरती पूर्व
प्रशिक्षण योजना राबविण्यात येते.
महाज्योती मार्फत सन
2022-23 या आर्थिक वर्षात इतर मागास वर्ग,
विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी पोलीस
भरती परीक्षापूर्व प्रशिक्षण योजना सुरु करण्यात आलेली आहे. या योजनेचा लाभ
घेण्यासाठी दि. 6 जानेवारी, 2023 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती.
प्रशिक्षणास इच्छूक नॉनक्रिमिलेअर उत्पन्न गटातील उमेदवारांकडून महाज्योतीच्या
संकेतस्थळावर अर्ज मागविण्यात आले होते. त्याकरिता एकूण 507 उमेदवारांनी अर्ज
केले. निवड प्रक्रियेत यशस्वी 482 उमेदवारांना प्रशिक्षणाचा लाभ घेता आला.
उमेदवारांना दरम्यानच्या काळात प्रतिमाह 6 हजार विद्यावेतन देण्यात आले. नुकतेच या
प्रशिक्षणातून 18 प्रशिक्षणार्थ्यांची महाराष्ट्र पोलीस दलात निवड झालेली आहे.
यशस्वी
विद्यार्थ्यांमधे जयश्री चव्हाण, पल्लवी चिलगर, राहूल राठोड, रोहिदास खेडेकर,
विकास मुंडे, असाराम चौरे, अश्विनी राठोड, अक्षय भोई, हरसिंग जारवाल, प्रताप
बोऱ्हाडे, शंकर सुल, सतीश गिरी, सुजाता सोनटक्के, जालिंदर अवघड, सुवर्णा पाटील,
योगेश दारुंटे, जगदीश चव्हाण, सुरज जाधव या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
महाज्योतीचे अध्यक्ष
तथा इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे
अभिनंदन केले. तसेच महाज्योती तर्फे राबविण्यात येणाऱ्या पोलीस भरती परीक्षापूर्व
प्रशिक्षण योजनेचा अधिकाधिक विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा,असे आवाहन केले आहे. महाज्योतीचे
व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करुन त्यांना पुढील
वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे मनोगत
घरी कोरडवाहू शेती
असल्याने आई-बाबा बाहेर कामाला जायचे. माझे बारावी झाले, तसे मला लवकरात लवकर त्यांना
आर्थिक हातभर लावायचा होता. अश्यात मला मित्राने महाज्योतीच्या पोलीस भरतीपुर्व
प्रशिक्षण योजनेची माहिती दिली. मी सर्व सुचनांचे पालन करुन ऑनलाईन अर्ज केला. आणि
माझी निवड झाली. लगेचच संबोधी अकादमीत माझे शारिरीक शिक्षण, लेखी परीक्षेचे
क्लासेस सुरु झाले. सोबत 6000 रुपये विद्यावेतनही सुरु झाले. विद्यावेतनाची खुप
आर्थिक मदत झाली. शहरात राहण्या खाण्याची सोय झाली. निश्चिंत मनानी अभ्यास करता
आला. यशस्वी होता आले. आज मला मुंबईला पोस्टींग मिळाले आहे. मी खुप नशीबवान आहे
मला महाज्योतीच्या या योजनेचा लाभ घेता आला. आणि माझे भविष्य सुरक्षित करता आले.
- राहूल राठोड, सेनगाव, हिंगोली.
मला महाज्योतीच्या सोशल
साईटवरुन पोलीस भरतीपुर्व प्रशिक्षण योजनेची माहिती मिळाली. ऑनलाईन अर्जप्रक्रिया
पार पडली आणि निवड झाल्याचे कळले. मनात थोडी भीती होती. आर्थिक काळजीही होती. पण
संपुर्ण प्रशिक्षण काळात महाज्योतीकडून 6000 रुपये विद्यावेतन दिल्या गेले. त्याने
या शहरात राहण्या खाण्याच्या प्रश्न मिटला. अतिशय अनुभवी शिक्षकांकडून उच्च
दर्जाचे प्रशिक्षण दिल्या गेले. लक्षात रहावे अश्या गुणी शिक्षकांकडून ट्रेनींग
दिल्या गेले. मुलगी म्हणून कुठेही असुरक्षीतता वाटू दिली नाही. अतिशय खेळीमेळीच्या
वातावरणात आमचे प्रशिक्षण पार पडले. आज माझी पोस्टींग लातूर जिल्ह्यात झालेली आहे.
महाज्योतीने जगण्याचा मार्ग सुकर केला आहे.
- पल्लवी चिलगर, चिलगरवाडी, परभणी
*****
No comments:
Post a Comment