12 June, 2023

 

ऊसतोड कामगार महिला मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

ऊसतोड कामगांरानी नाव नोंदणी करुन शासनाच्या विविध योजनेचा लाभ घ्यावा

                                                                                                - जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

 




            हिंगोली (जिमाका), दि. 12 : शासनाच्या कै.गोपीनाथ मुंडे ऊसतोड महामंडळाच्या माध्यमातून ऊस तोड कामगारांना एक नवीन ओळख मिळाल्यामुळे जिल्हयातील जास्तीत जास्त ऊसतोड महिला/पुरुष कामगारांनी आपली नाव नोंदणी करुन त्यांच्यासाठी शासनाकडून मिळणाऱ्या विविध योजनेचा लाभ घ्यावा, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी ऊसतोड कामगारांना मार्गदर्शन करतेवेळी केले.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभांगाच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात आज दि. 12 जून, 2023 रोजी ऊसतोड कामगार महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या महिला मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या ऊसतोड कामगार महिला मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी  एन. आर. केंद्रे, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगीरे,  जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजु एडके, गटविकास अधिकारी गणेश बोथीकर, जिल्हा कामगार अधिकारी तातेराव कराड, उगम संस्थेचे अध्यक्ष जयाजी पाईकराव, सौ.पाईकराव, छायाताई पडघन, मकामच्या कार्यकर्त्या साधना सावंत, श्रीमती मानसी, श्रीमती प्रणाली, श्रीमती आरती, महिला किसान मंचचे हर्ष मकाम, ऑनलाईन सॉफ्टवेअरचे प्रतिनिधी  रोटे  तसेच व्यसनमुक्तीचा प्रचार व प्रसार तज्ञ विशाल अग्रवाल आदी  प्रमुख पाहुणे उपस्थित होते.

            प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते महामानव क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीसुर्य सावित्रीबाई फुले, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहु महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.

            या कार्यक्रमाचे प्रास्ताविक छायाताई पडघन यांनी केले. तर सूत्रसंचलन अर्चना सवा दिंडे यांनी केले. याप्रसंगी ठरावाचे वाचन शारदाताई यांनी केले. या कार्यक्रमाला वसमत व औंढा तालुक्यातील ऊसतोड कामगारांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

*****

No comments: