01 June, 2023

 

स्वातंत्र्य संग्रामात सहभाग नसला तरी  कर्तव्यातून  राष्ट्रसेवा  करण्याची

आम्हाला  संधी  मिळाली  त्याचे सोन करावे. . . !

                                                - अविनाश देवसटवार, प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण

 



            हिंगोली (जिमाका), दि. 01 : स्वातंत्र्य संग्रामात सहभाग नसला तरी  कर्तव्यातून राष्ट्रसेवा करण्याची आम्हाला संधी मिळाली त्याचे सोन करावे, असे मनोगत लातूर विभागाचे समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार यांनी आयोजित कार्यशाळेत व्यक्त केले.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत मागासवर्गीय पात्र विद्यार्थ्यांना भारत सरकार शिष्यवृत्ती वाटप करण्यात येते. तसेच ज्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना हिंगोली शहरातील शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळालेला नाही. त्या विद्यार्थ्यांसाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरु करण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने  हिंगोली  जिल्हयातील सर्व कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयांचे प्राचार्य व महाविद्यालयातील समान संधी केंद्र प्रतिनिधी यांची कार्यशाळा दि. 31 मे, 2023 रोजी आयोजित करण्यात आली होती.

            या कार्यशाळा  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लातूर विभागाचे समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून समर्थ महाविद्यालयाचे प्राचार्य सुरेश कोल्हे,  संत गाडगेबाबा बी.एड महाविद्यालयाचे प्राचार्य मधुकर पुंडगे, वसंतजी भट, उगम संस्थेचे जयाजी पाईकराव, नाकाडे, प्रशिक्षक आकाश बगाटे, तसेच सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगीरे, जिल्हा ऊसतोड कामगार संघटनेच्या छायाताई पडघन आदी उपस्थित होते.

            सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या नवनवीन विविध योजनेच्या सॉफ्टवेअरचा कसा वापर करावा याबाबत प्रशिक्षक आकाश बगाटे यांनी सविस्तर माहिती दिली. तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगीरे यांनी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  पल्लवी  गीते यांनी केले. तसेच कार्यक्रमाचे शेवटी आभार प्रदर्शन कार्यालय अधीक्षक सत्यजीत नटवे यांनी केले. कार्यशाळेच्या सुरुवातीला मान्यवरांच्या  हस्ते दिपप्रज्वलन व मान्यवरांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करण्यात आले.

            यावेळी  हिंगोली  जिल्ह्यातील 157 महाविद्यालयातील  प्राचार्य व शिष्यवृत्तीचे कामकाज पहाणारे कर्मचारी असे एकूण 300 ते 350 कर्मचारी या कार्यशाळेस उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतील सर्व कर्मचारी वृंद यांनी सहकार्य केले.

*****

No comments: