27 June, 2023

 

                                                    

ऊसतोड कामगारांच्या भल्यासाठी गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळ 

·         शासन आपल्या दारी ; ओळखपत्र आपल्या घरी !

 

राज्यातील प्रमुख उद्योगापैकी एक उद्योग असणाऱ्या साखर उद्योग क्षेत्रात ऊसतोडणीचे काम करणारे बहुतांश कामगार हे मराठवाडा विभागातील आहेत. ऊसतोडणीच्या ऐन हंगामात विविध गाव-तांड्यावरुन  दरवर्षी मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होते. या हंगामी होणाऱ्या स्थलांतरणामुळे त्यांच्या कुटुंबियाना अनेक सामाजिक प्रश्न निर्माण होतात आणि ते तितकेच भेडसावतातही. त्यांच्या या स्थलांतरामुळे वृद्धांच्या दैनंदिन आरोग्याची काळजी घेणे, ज्येष्ठ आजारी नागरिकांना वेळेत उपचारासाठी रुग्णालयात  नेणे, लहान मुलांची शाळेतील अनुपस्थिती, शालेय किशोरवयीन मुलींची काळजी घेणे किंवा मग अनिच्छेने का होईना त्यांचा विवाह करणे, त्यांची घरे, पाळीव जनावरे, प्राण्यांच्या देखभाल करणे यासह ऊसतोड कामगाराची गरोदर पत्नी असल्यास एकतर तिची काळजी घेण्यासाठी घरी थांबणे किंवा मग तिला सोबत ठेवण्याशिवाय दुसरा पर्यायच त्या ऊसतोड कामगाराकडे राहत नाहीत. यासह इतर अनेक समस्यांना या कामगारांना तोंड द्यावे लागते.

या व्यवसायातील कामगारांना महाराष्ट्र राज्य साखर कारखाना संघाच्या स्तरावरुन दरवर्षी होणाऱ्या सामंजस्य करारानुसार मजुरी व अन्य लाभ देण्यात येत असले तरी ऊसतोड कामगारांना भविष्य निर्वाह निधी, कामगार राज्य विमा योजना, उपदान, नुकसान भरपाई, सानुग्रह अनुदान ई. सामाजिक सुरक्षितता योजनांचे लाभ देण्याची आवश्यकता आहे. तसेच त्यांच्या पाल्यांना विशेष अशा शैक्षणिक सुविधा पुरविणे देखील आवश्यक आहे. या सर्व बाबींचा विचार करुन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत ऊसतोड कामगारांना ओळखपत्र देणे तसेच स्थानिक पातळीवर निर्माण होणाऱ्या समस्यांचे निराकरण करणे सुरु आहे. यासाठी लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाची स्थापना करण्यात आली असून, या महामंडळाच्या माध्यमातून त्यांना ओळखपत्र देण्याचे काम गतीने सुरु आहे. 

 आतापर्यंत उपेक्षित असलेल्या ऊसतोड कामगारांची नोंदणी करुन ओळखपत्र देने या योजनेत हिंगोली जिल्ह्यात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, समाज कल्याणचे सहायक आयुक्त शिवानंद मिनगीरे यांच्या पुढाकारातून जिल्ह्यात ऊसतोड कामगारांची नोंदणी करुन त्यांना ओळखपत्र देण्याचे काम गतीने सुरु आहे.

        हिंगोली जिल्ह्यातील सतत तीन वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त काळ काम करणारे ऊसतोड कामगार 11 हजार 985 असून, ते व त्यांचे कुटुंबीय अस्थिर व हलाखीचे जीवन जगत आहेत. या ऊसतोड कामगारांच्या राहणीमानात बदल होण्यासाठी विविध सामाजिक व आरोग्यविषयक कल्याणकारी योजना राज्य शासनाने सुरु केल्या आहेत. राज्य शासनाकडून गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाची 13 सप्टेंबर 2019 रोजी स्थापना करण्यात आली आहे. या महामंडळाच्या माध्यमातून 4 ऑगस्ट 2021 च्या शासन निर्णयानुसार ऊसतोड कामगारांना स्थिर व सुरक्षित जीवन जगता यावे, यासाठी शासनाकडून ठोस पावले उचलण्यात येत आहेत.  वास्तव्यास असलेल्या ठिकाणी व सतत मागील तीन वर्षांपासून ऊसतोड कामगार असणाऱ्यांना ग्रामसेवकाने ओळखपत्र देणे अपेक्षित आहे. हे काम वेळेत पूर्ण व्हावे, कामात सुलभता यावी तसेच स्थानिक पातळीवर काही समस्या उद्भवल्यास तातडीने निराकरण करता यावे, यासाठी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली आहे.

            लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या कामास गती देण्यासाठी महामंडळाचे मुख्यालय पुणे येथे 3 एप्रिल 2022 रोजी सुरु करण्यात आले आहे. आतापर्यंत उपेक्षित असलेल्या ऊसतोड कामगारांची नोंदणी करुन ओळखपत्र देण्यात येत आहे. या ओळखपत्राच्या माध्यमातून त्यांना शासकीय पातळीवर स्वतंत्र ओळख मिळवून देण्यात येत आहे. भविष्यात ऊसतोड कामगार व त्यांच्या कुटूंबियांसाठी विविध योजनांचा लाभ देण्यात येणार आहे. त्यामध्ये घरकुल, वैद्यकीय सुविधा, ऊसतोड करतेवेळी होणारे अपघात लक्षात घेता, भविष्यासाठी राज्य विमा योजना, त्यांच्या पाल्यांसाठी संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह योजना, कौशल्य विकास योजना, कमी व्याजदराने भांडवली कर्ज योजना, ऊसतोड वाहक व चालकांसाठी विमा योजना, स्वस्त धान्य योजना, अंगणवाडी शाळा ई. योजना राबविण्यात येत आहेत.  

            जिल्ह्यात  5 साखर कारखाने कार्यरत असून, त्यामध्ये ऊसतोड कामगार म्हणून नोंदणी झालेल्यांची संख्या ही 11 हजार 985 एवढी आहे.  यामध्ये पूर्णा सहकारी साखर कारखाना वसमतनगर येथे 5 हजार 9, टोकाई सहकारी साखर कारखाना लि. कुरुंदा ता. वसमत येथे 987, कपिलेश्वर सहकारी साखर कारखाना लि.बाराशीव ता.वसमत  येथे 910, शिऊर सहकारी साखर कारखाना लि.वाकोडी ता. कळमनुरी येथे 2 हजार 263, भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना, डोंगरकडा ता. कळमुनरी येथे 2 हजार 816 असे एकूण 11 हजार 985 ऊसतोड कामगारांची नोंदणी करण्यात आली आहे.

मागील दोन वर्षात या योजनेंतर्गत 01 हजार 353 ऊसतोड कामगारांना ओळखपत्र देण्यात आले आहे. येथील सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयात ऊसतोड कामगारांचे मेळावे घेऊन त्यांना ओळखपत्राचे वितरण करण्यात आले आहे.

ऊसतोड कामगार व त्यांच्या कुटूंबीयांसाठी आरोग्य शिबीर :

              हिंगोलीचे तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार यांनी ऊसतोड कामगार व त्यांच्या कुटुंबियासाठी आतापर्यंत हिंगोली जिल्ह्यात प्रत्येक कारखान्यावर प्रत्येकी एक व सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयात एक असे एकूण 06 आरोग्‍य शिबिरे घेऊन एकूण 1 हजार 812 ऊसतोड कामगार व त्यांच्या कुटूंबियांची आरोग्य तपासणी करुन लाभ दिला आहे. तसेच त्यांना विविध लाभ मिळवून देण्यासाठी जनजागृती करण्यात येत आहे.

 

चंद्रकांत कारभारी, माहिती सहायक

       जिल्हा माहिती कार्यालय, हिंगोली

****

 

No comments: