20 June, 2023

 

 

निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली म्हणजे योग…!

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 च्या राष्ट्रीय महासभेत दिनांक 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योगा दिन म्हणून दरवर्षी साजरा करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. तसेच संयुक्त राष्ट्रसंघाने 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषित केला आहे. त्याअनुषंगाने दि. 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योगा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. हा दिवस जगभरात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो. पाच हजार वर्षाहून अधिक परंपरा असणारी योगविद्या ही भारताने जगाला दिलेली देणगी आहे. व्यक्तीच्या शारीरिक आणि आत्मिक विकासासाठी योगविद्या सहाय्यभूत आहे. यंदाचा आंतरराष्ट्रीय  योगा दिन मनुष्याच्या थीमवर आधारित आहे. योगा करणे रोजच्या आयुष्यात  किती  महत्वाचे हे  लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या वर्षीच्या योगा दिनाची थीम ही मानवता (Humanity) अशी आहे. 

केंद्र शासनाने दि. 21 जून, 2023 हा दिवस नववा आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा करण्याचे निर्देश दिले आहेत. योगा दिनाच्या निमित्ताने जगभरात योगासनाची परंपरा स्वीकारणे व ती करणे ही आपल्या देशासाठी अभिमानाची बाब आहे. कारण योग हा आपल्या भारताच्या सांस्कृतिक वारसाचा अविभाज्य भाग आहे. दि. 21 जून, 2023 रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करुन जगभरातील लोकांना योगाच्या सुसंस्कृतपणाबद्दल आठवण करुन देण्यासाठी जनतेमध्ये कायमस्वरुपी , चिरस्थायी जनहित निर्माण करण्यासाठी योगाचा सराव सुरु ठेवण्यासाठी लोकांना प्रेरणा देणे तसेच योगासने नागरिकांचा एक अविभाज्य भाग बनविणे आणि त्याद्वारे सर्वांसाठी आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी योग दिन साजरा करण्याचे शासनाचे उद्दिष्ट आहे. 

त्यासाठी जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पंतजली योग समिती, योग विद्याधाम यांच्या संयुक्त विद्यमाने हिंगोली येथील संत नामदेव कवायत मैदानावर नवव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन दि. 21 जून, 2023 रोजी सकाळी 5.45 वाजता करण्यात आले आहे. याचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

योगाचे महत्त्व :

योगाचे आपल्या आयुष्यात खूपच महत्त्व आहे. रोज योग केल्याने माणूस ताणतणावपासून दूर राहतो. इतकेच नाही तर माणसाचे वजन, हाडे, मांसपेशी आणि सांधेदेखील दणकट राहतात. योगामुळे शरीरामध्ये ऊर्जा निर्माण होते. शिवाय नियमित योग केले तर कोणत्याही आजारापासून माणूस दूर राहू शकतो. पण त्यासाठी ही गोष्ट नियमित करणे आवश्यक आहे. योगामुळे रक्तदाब देखील नियंत्रणात राहातो. त्यामुळे योग हा बऱ्याचशा आजारांना दूर ठेवतो, जे जास्त महत्त्वाचे आहे. ध्यानधारणा करणे हे शरीरासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. काही मिनिटे ध्यान लावून बसले की, माणसाच्या मनात आणि शरीरामध्ये शक्तीचा संचार होतो. सकाळीच ध्यान केल्यामुळे माणसाचे मन एका विशिष्ट दिशेने कार्यरत राहते. तसेच पूर्ण दिवस मन एकाग्र, शांत आणि संतुलित राहते; दिवसभराच्या तणावपासून दूर राहण्यास मदत होते. योग केल्याने तुमच्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. योग केल्याने तुमचे स्नायू मजबूत होतात. श्वसन प्रक्रिया सुधारते आणि नियमित योगा केल्याने तुम्हाला भरपूर ऊर्जा मिळण्यास मदत होते. 

            योग शरीर आणि मन दोन्हीसाठी  फायदेशीर आहे. नियमित योगाभ्यास केल्याने आरोग्याशी संबंधित सर्व समस्या दूर होऊ शकतात. योगामुळे मानसिक शांती मिळते. ज्यामुळे वातावरण आणि परिसर आनंदी होतो. योगासने शरीरातील स्नायूंना खूप मजबूत करतात. योगासनामुळे व्यक्तीची श्वाच्छोश्वासाची प्रक्रिया सुधारते. हे एखाद्याच्या शरीरात शक्ती आणि ऊर्जा निर्माण करण्यास मदत करते. चयापचय प्रकिया संतुलित करण्यास मदत करते. शरीराला चांगला आकार देते. त्यामुळे योगाला निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली म्हणणे योग्य होईल.

 

                                                                                                - चंद्रकांत कारभारी, माहिती सहायक

                                                                                                   जिल्हा माहिती कार्यालय, हिंगोली

*****

No comments: