टीबी मुक्त ग्रामपंचायतीचे प्रस्ताव गटविकास अधिकारी यांच्याकडे
सादर करावेत
- मुख्य कार्यकारी अधिकारी
हिंगोली (जिमाका),
दि. 01 : केंद्र शासनाच्या सुचनेनुसार
हिंगोली जिल्ह्यात टीबी मुक्त पंचायत कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करुन जास्तीत
जास्त ग्राम पंचायती टीबी मुक्त कराव्यात. यासाठी आरोग्य विभागाच्या समन्वयाने ग्राम
पातळीवर टीबी मुक्त ग्रामपंचायत बाबत जनजागृती करुन सर्व ग्रामसेवक, ग्रामपंचायतचे
कर्मचारी, सरपंच तसेच ग्रामपंचायतीचे सदस्य यांच्या सहकार्याने जास्तीत जास्त गावपातळीवर
ही मोहिम राबवावी आणि येणाऱ्या जागतिक क्षयरोग दिनाच्या दिवशी हिंगोली जिल्ह्यातील
जास्तीत जास्त ग्रामपंचायत टीबी मुक्त कराव्यात. तसेच टीबी मुक्त ग्रामपंचायतीला केंद्र
शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार बक्षीस देखील देण्यात येणार आहे. त्यासाठी सर्वांनी
प्रयत्न करणे गरजेचे आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीने आपल्या गावातील नागरिकांच्या तपासण्या
करुन आपली ग्रामपंचायत टीबी मुक्त झाली आहे, असा प्रस्ताव पंचायत समितीला गटविकास अधिकाऱ्यांकडे
सादर करावा. या प्रस्तावाची पडताळणी करुन वरिष्ठ स्तरावर प्रस्ताव सादर करुन ग्रामपंचायत
टीबी मुक्त झाल्याचे घोषित केले जाईल याची दक्षता घ्यावी, असे निर्देश मुख्य कार्यकारी
अधिकारी नामदेव केंद्रे यांनी बैठकीत दिले.
राष्ट्रीय क्षयरोग
दुरीकरण कार्यक्रमांतर्गत केंद्र शासनाचा टीबी मुक्त ग्रामपंचायत असा कार्यक्रम संपूर्ण
हिंगोली जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी
अधिकारी नामदेव केंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हा परिषदेच्या सभागृहात बैठकीचे
आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.कैलास शेळके, जिल्हा क्षयरोग
अधिकारी डॉ. जी. एस. मिरदुडे, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. गणेश जोगदंड, तालुका आरोग्य
अधिकारी डॉ. सतीश रुणवाल, डॉ. नामदेव कोरडे, डॉ. संदीप काळे, डॉ. डी. व्ही. सावंत,
गटविकास अधिकारी जी. पी. बोथीकर, पी. एस. बोंढारे, यु. डी. तोटावाड, बी. आर. गोरे,
ए.टी. आंधळे यांची उपस्थिती होती.
बैठकीचे
प्रास्ताविक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलाश शेळके यांनी केले. तर डॉ. मिरदुडे यांनी
आभार मानले. बैठकीसाठी क्षयरोग विभागातील सर्व कर्मचारी, तसेच आरोग्य विभागातील कर्मचारी
उपस्थित होते.
*****
No comments:
Post a Comment