मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजनेच्या अंमलबजावणीसाठी
शेतकऱ्यांनी भाडेतत्वावर जमीन उपलब्ध करुन देण्यासाठी अर्ज
करावेत
हिंगोली (जिमाका), दि. 21 : मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी
योजना ही महाराष्ट्र शासन पुरस्कृत योजना
असून या योजनेद्वारे शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा करणे हे शासनाचे ध्येय आहे. या
योजनेच्या अंमलबजावणीसाठी महावितरण कंपनीचे 33/11 के.व्ही. उपकेंद्रापासून खाजगी
जमीन तसेच शासकीय गायरान जमीन 5 किमी ते 10 कि.मी. अंतरापर्यंत असणे आवश्यक आहे. या
योजनेमध्ये शेतकरी त्यांच्या स्वत:च्या मालकीची जमीन भाडेतत्वावर महावितरण कंपनीस
देऊन प्रती एकरी प्रती वर्ष 50 हजार रुपये
भाडे प्राप्त करु शकतात. या भाडे रकमेवर 3 टक्के वार्षिक वाढ देखील देय आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी
शेतकऱ्यांनी कमीत कमी 3 एकर ते जास्तीत जास्त 50 एकर क्षेत्रापर्यंतच्या जमिनीसाठी
अर्ज करु शकतात. अर्जदार शेतकऱ्यांची जमीन 33/11 केव्ही उपकेंद्रापासून 5 किमी
अंतरापर्यंत असावी. या जमिनीस पोहोच रस्ता उपलब्ध असावा. या योजनेचा लाभ
घेण्यासाठी https://mskvy.mahadiscom.in/MSKVYSolar/
या लिंकवर जाऊन अर्ज करावेत.
तसेच 33/11 केव्ही उपकेंद्रापासून 10
किमी अंतरापर्यंत शासकीय जमीन उपलब्ध असल्यास संबंधित ग्रामपंचायतींनी स्थापत्य
उपविभाग, महावितरण कार्यालय, बस स्थानकाजवळ, हिंगोली येथे संपर्क साधावा, असे
आवाहन उप कार्यकारी अभियंता (स्थापत्य), महावितरण, हिंगोली यांनी केले आहे.
*****
No comments:
Post a Comment