23 June, 2023

 

हेल्मेट युक्त हिंगोली अपघात मुक्त हिंगोलीसाठी सहकार्य करण्याचे आवाहन

हेल्मेट सक्ती नियमाचे पालन न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई- अनंता जोशी

 

हिंगोली (जिमाका), दि. 23 : भारतामध्ये दरवर्षी जवळपास 1.50 लाख व्यक्ती तर महाराष्ट्रात सुमारे 15000 व्यक्ती रस्ते अपघातांमध्ये  आपला जीव गमावतात. रस्ते अपघात ही एक गंभीर समस्या आहे. कित्येक लोकाना अपघातामुळे कायमचे अपंगत्व येते. या अपघातामध्ये संख्यात्मक दृष्टीने विचार केल्यास जानेवारी 2022 ते डिसेंबर 2022 या कालावधीत  झालेल्या  एकूण अपघातापैकी  51 टक्के पेक्षा अधिक अपघात दुचाकी चालकाचे झालेले आहेत. त्यामध्ये 7700 लोक मृत्यमुखी पडले आहेत. दुचाकी वाहनांच्या अपघातांचा शास्त्रीय पध्दतीने अभ्यास केल्यास असे निर्देशनास येते की, अधिकतर दुचाकी चालकांचे अपघातातील मृत्यु हे वाहन चालविताना हेल्मेट न घातल्यामुळे व डोक्याला इजा झाल्यामुळे होतात. ही बाब रस्ता सुरक्षेच्या दृष्टीकोनातून अतिशय चिंताजनक आहे.

या पार्श्वभूमीवर दुचाकी  वाहन  चालकांच्या अपघाताचे तसेच अपघाती मृत्युचे प्रमाण कमी करण्याच्या  उद्देशाने  हिंगोली  जिल्हयात  दुचाकी  चालकाचे  रस्ता सुरक्षा व कायदेशीर तरतुदीबाबत समुपदेशन होणे अत्यंत गरजेचे आहे. त्या अनुषंगाने या कार्यालयामार्फत दुचाकी वाहन चालकांसाठी मोटार वाहन कायद्यात ज्या तरतुदी आहेत त्यांची अंमलबाजावणी करण्यासाठी  हिंगोली  जिल्हयात  समुपदेशन उपक्रम सुरु करुन खालील प्रमाणे उपाययोजना करण्यात येत आहे.

लायसन्स नसलेल्या व अल्पवयीन मुलांना दुचाकी चालविण्यापासून प्रतिबंध करणे व पालकांचे समुदेशन करणे. (मोटार वाहन कायदा 1988, कलम 3,4) : मोटार वाहन कायदा 1988 मधील कलम 4 अंतर्गत अठरा वर्षाखालील कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी मोटार वाहन चालवु नये, परंतु 50CC पेक्षा जास्त नसलेली इंजिन क्षमता असलेली मोटार सायकल वयाच्या सोळाव्या वर्षानंतर कोणत्याही व्यक्तीस सार्वजनिक ठिकाणी चालविता येईल. कलम 18 च्या तरतुदीच्या अधीन राहून वीस वर्षापेक्षा कमी वयाच्या कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी वाहतूक वाहन चालवू नये.

अशा परिस्थितीत लायसन्स नसलेल्या अल्पवयीन मुलांना दुचाकी चालविण्यापासून प्रतिबंध करणे तसेच त्यांच्या पालकांचे समुपदेशन करणे तरीही नियमाचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर मोटार वाहन चालविण्याची  पालकांनी  परवानगी दिल्यास मोटार वाहन कायदा 1988 कलम 199 (अ) अंतर्गत 25 हजार रुपये दंडाच्या शिक्षेची तरतूद असून अशा मुलांना वयाच्या 25 वर्षापर्यंत लायसन्स देण्यापासून प्रतिबंध करण्यात आलेले आहे, याबाबत पालकाचे लक्षात आणुन देणे व त्यांना समुपेदशन करणे.

मोटार वाहन कायदा 1985 मधील कलम 112 अंतर्गत मर्यादेचे पालन करणे : कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी वाहनासाठी या अधिनियमाद्वारे किंवा त्यावेळी अंमलात असलेल्या इतर कोणत्याही अधिनियमाद्वारे किंवा अन्वये निश्चित करण्यात करण्यात आली असेल अशा वेगमर्यादेपेक्षा अधिक वेगाने एखादी मोटारसायकल चालविता कामा नये किंवा मोटार सायकल चालविण्यास भाग पाडू नये किंवा अनुमती देता कामा नये.

मोटार वाहन कायदा 1955 कलम 184 धोकादायक पध्दतीने वाहन चालविणे : वेग मर्यादेचे उल्लंघन करुन धोकादायकपणे वाहन चालवू नये यासाठी दुचाकीस्वार यांचे समुपदेशन करणे तरीही नियमाने उल्लंघन केल्यास संबंधितावर मोटार वाहन कायदा 1988 कलम 184 अंतर्गत दंडात्मक कारवाई करणे.  दाहाल नये यासाठी दुचाकीस्वार यांचे समुपदेशन करणे तरीही मोटार कायरा 1955 कलम 154 अंतर्गत दंडात्मक कारवाई करणे.

मोटार सायकल वाहनांवर सुरक्षेकरिता आवश्यक उपकरणाची अंमलबाजावणी करणे : केंद्रीय मोटार वाहन नियम 1989, कलम 123 च्या नियमानुसार सर्व प्रकारच्या दुचाकी वाहनावर मोटार सायकलच्या निर्मात्याने त्यांचे निर्मितीदरम्यान मोटारसायकलच्या दृष्टीने आवश्यक उपकरणे बसविणे बंधनकारक आहे.

सर्व दुचाकी वाहनांवर सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक असणारी उपकरणे उदा. पाठीमागील चाकावर जाळी, पाठीमागील व्यक्तीसाठी हॅन्डरेस्ट, पाय ठेवण्यासाठी दोन्ही बाजुला फुटरेस्ट असणे बंधनकारक आहे. याबाबत सर्व दुचाको बाहनांची तपासणी करुन दुचाकीस्वार यांचे याबाबत समुपदेशन करणे तसेच अंमलबजावणी करणे.

दुचाकीवर मोटारसायकलस्वार स्वतः व्यतिरिक्त एकापेक्षा अधिक व्यक्ती घेऊन जाणार नाही या कायदेशीर तरतूदीची अंमलबजावणी करणे : मोटार वाहन कायदा 1988 मधील कलम 128 नुसार प्रत्येक मोटार सायकलस्वार स्वतः व्यतिरिक्त एकापेक्षा अधिक व्यक्तीना घेऊन जाऊ शकत नाही. कलम 194C नूसार जो व्यक्ती कलम 128 किंवा त्याखाली बनवलेल्या नियमांचे उल्लघन करुन दुचाकी चालवतो किंवा परवानगी देतो तो एक हजार रुपये दंडास पात्र ठरतो आणि तीन महिन्याच्या कालावधीसाठी लायसन्स धारण करण्यासाठी अपात्र ठरेल. याबाबत दुचाकीस्वार यांचे समुपदेशन करणे तरीही नियमाचे उल्लंघन केल्यास संबधितावर मोटार वाहन कायदा 1988 कलम 194C अतंर्गत दंडात्मक कारवाई करावी.

वाहन उत्पादकामार्फत वाहन खरेदीच्या वेळी खरेदीदारास दोन हेल्मेटचा पुरवठा करण्याच्या कायदेशीर तरतुदीची अंमलबजावणी करणे : मोटार वाहन कायदा 1988 कलम 138 (4) (f) अन्वये वितरकाने नवीन दुचाकी वाहन विकल्यावर खरेदीदारास BSI मान्यतेचे दोन हेल्मेट देणे बंधनकारक आहे. प्रत्येक दुचाकी विक्रेत्याने या नियमाची अंमलबजावणी करणे बंधनकारक आहे. जे वितरक या नियमाचे पालन करत नसतील त्यांचे वर कायदेशीर कार्यवाही करणे.

हेल्मेट वापरासाठी दुचाकीचालक / दुचाकीस्वार वाहनमालक व कारणीभूत असलेल्या व्यक्तीचे /संस्थाचे समुपदेशन व दंडात्मक कारवाई करणे : मोटार वाहन कायदा 1988 मधील कलम 194 ड मधील तरतुदीनुसार हेल्मेट वापरासंबंधी तरतुदीचा भंग करणाऱ्या अथवा त्यास संमती देणाऱ्या व्यक्तीस दंडाची तरतुद पुढील प्रमाणे आहे.

मोटार वाहन कायदा 1988 कलम 129 अन्वये प्रत्येक व्यक्तीने (4 वर्षावरील) वाहन चालवितांना किंवा कोणत्याही वर्गाच्या किंवा वर्णनाच्या मोटार सायकलवरुन जात असताना, सार्वजनिक ठिकाणी केंद्र सरकारने विहित केलेल्या मानकांनुसार हेल्मेट घालणे बंधनकारक आहे. कलम 194 (ड) अन्वये विनाहेल्मेट दुचाकी चालविणे किंवा चालविण्यास संमती देणे अशा दोघावरही जबाबदारी निश्चित करण्यात आलेली असून त्यांना दंडात्मक कारवाईची तरतूद आहे.

येथील उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत यापूर्वी हिंगोली जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, खाजगी संस्था, कंपन्या येथील आस्थापनेवरील दुचाकी वापरणारे अधिकारी व कर्मचारी, सर्व कॉलेजमधील विद्यार्थी, सामान्य नागरिक जे दुचाकी वापरतात त्यांना हेल्मेट वापरणे कायद्याने बंधनकारक असल्याबाबत जनजागृती करण्यात आलेली आहे. तसेच त्यांना लेखी पत्र पाठवून कायद्यातील तरतुदीची अधिकची जाणीव सुदधा करुन देण्यात आली आहे.

त्या अनुषंगाने उपरोक्त नियमाचे काटेकोर पालन करुन शासनास सहकार्य करावे. हेल्मेट सक्ती नियमाचे पालन न करणाऱ्या दोषी वाहन चालक व मालक यांच्याविरुध्द दंडात्मक कारवाई करण्यात याची नोंद घ्यावी, असे आवाहन अनंता जोशी, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.

*****

No comments: