02 June, 2023

 

स्वस्त दरात वाळू उपलब्ध करुन देण्यासाठी गोळेगाव येथे वाळू डेपो तयार

तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करुन प्रायोगिक तत्वावर चार लाभार्थ्यांना वाळूचे वाटप

 

  • ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण करुन लाभ घेण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे आवाहन

 

हिंगोली (जिमाका), दि. 02 : महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या दि. 19 एप्रिल, 2023 च्या शासन निर्णयान्वये नागरिकांना बांधकाम योग्य वाळू स्वस्त दराने उपलब्ध करुन देणे तसेच अनाधिकृत वाळू उत्खननाला आळा घालण्याच्या उद्देशाने वाळू, रेतीचे उत्खनन, साठवणूक व विक्री व्यवस्थापन करण्यासाठी नवीन धोरण जाहीर केलेले आहे.

या नवीन वाळू धोरणानुसार हिंगोली जिल्ह्यात औंढा नागनाथ तालुक्यातील गोळेगाव येथे वाळू डेपो तयार करण्यात आला आहे. या वाळू डेपोतून आज दि. 2 जून, 2023 रोजी घरकुलाच्या लाभार्थ्यांना विनामूल्य 5 ब्रास वाळू देण्यासाठी तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करुन प्रायोगिक तत्वावर चार लाभार्थ्यांना वाळू वाटप करण्यात आले. या डेपोवरुन नागरिकांना प्रती ब्रास 600 रुपये अधिक इतर कर 77 रुपये याप्रमाणे डेपोत उपलब्ध होणाऱ्या वाळूच्या प्रमाणात ऑनलाईन प्रणालीवरुन वाळू विक्री करण्यात येणार आहे.

त्यासाठी जनतेने वाळू धोरण-2023 च्या अनुषंगाने वाळू बुकींग करण्यासाठी प्रथम इंटरनेट ब्राऊजर वर https://mahakhanij.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी. वेबसाईट ओपन झाल्यानंतर वरील बाजूस SAND BOOKING असे ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करावे. SAND BOOKING वर क्लिक केल्यानंतर संकेतस्थळ नवीन विंडोमध्ये उघडेल. त्यानंतर लॉग इन या बटनावर क्लिक करावे. त्यानंतर CONSUMER SIGN UP क्लिक करुन आवश्यक ती माहिती भरावी जसे नाव, मोबाईल क्रमांक व स्वत:चा ई-मेल आयडी इत्यादी माहिती भरावी. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर लॉग इन मध्ये युजर नेम म्हणजे तुम्ही रजिस्ट्रेशन करतेवेळी दिलेला मोबाईल क्रमांक व मोबाईलमध्ये प्राप्त झालेला पासवर्ड (OTP) टाकून लॉग इन करावे. त्यानंतर प्रोजेक्ट रजिस्ट्रेशनमध्ये आपली घर, इमारत, घरकुल इत्यादी माहिती भरुन प्रोजेक्ट रजिस्टर करावा. त्यानंतर आपल्याला प्रोजेक्टसाठी आवश्यक असलेल्या वाळूची बुकींग करावी. आपल्या जवळील अथवा संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या ठिकाणाचा STOCKYARD निवडावा. शेवटी ऑनलाईन पावतीने बुकींग केलेल्या वाळूचे पेमेंट करुन त्याची प्रत प्राप्त करुन घ्यावी व संबंधित STOCKYARD वर जाऊन पैसे भरल्याची प्रत जमा करुन वाळू प्राप्त करुन घ्यावी.

वरीलप्रमाणे ऑनलाईन अर्जाची  प्रक्रिया पूर्ण करुन जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.

*****

No comments: